हुक्का पार्लर्सवर उच्च न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही ठाण्यामध्ये पोलिसांच्या वरदहस्तामुळे सर्रास हुक्का पार्लर चालविले जात असल्याचे जनहित याचिकेद्वारे समोर येताच न्यायालयाने ठाणे पोलिसांना चांगलेच फैलावर घेतले. पोलीस हे कायद्याऐवजी हुक्कापार्लर्स चालविणाऱ्या हॉटेल मालकांशीच एकनिष्ठ असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, असे परखड बोल सुनावत न्यायालयाने ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना या आरोपांप्रकरणी व्यक्तिश: स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांच्या हातमिळवणीतूनच हे हुक्का पार्लर्स चालविले जात असल्याचा आरोप गंभीर असून वरिष्ठ अधिकाऱ्यानेच त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे, असे स्पष्ट करीत न्यायालयाने अतिरिक्त सरकारी वकील के. आर. बेलोसे यांना पोलीस आयुक्तांना व्यक्तिश: प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने या वेळी याचिकाकर्त्यांनाही दोन आठवडय़ांत घटनेची सविस्तर माहिती देणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे.
तंबाखू आणि सिगरेटविरुद्ध लढणारे ‘क्रुसेड ऑफ टॉबॅको’ या स्वयंसेवी संघटनेचे व्हिन्स्टेट नाझरेथ यांनी ही जनहित याचिका केली असून न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या खंडपीठासमोर त्यावर सोमवारी सुनावणी झाली. त्या वेळेस न्यायालयाने ठाणे पोलिसांना फटकारत हे आदेश दिले. घोडबंदर रोड येथील ‘हॉलीवूड-१८’ या हॉटेलमध्ये सर्रासपणे हुक्का पार्लर सुरू असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे उच्च न्यायालयाने हुक्का पार्लर्सवर बंदी घातली आहे. असे असतानाही हुक्का पार्लर्स सर्रासपणे चालविले जात असल्याचा याचिकादारांचा आरोप आहे. याचिकेनुसार,सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांत नाझरेथ यांनी या हॉटेलला भेट दिली होती. तेव्हा त्यांना तिथे शंभरहून अधिक तरुण हुक्का ओढताना आढळले. त्याबाबत त्यांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास आणि कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप नाझरेथ यांनी केला आहे. नंतर हॉटेलवर छापा टाकण्यात आला. मात्र त्या वेळी सर्वकाही ठिकठाक होते. हुक्का ओढणारी मुलेही बेपत्ता झाली होती. असे दोनवेळा घडले. त्यामुळे पोलिसांच्या वरदहस्तानेच हा हुक्कापार्लरचालविण्यात येत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.