हर्षद कशाळकर harshad.kashalkar@expressindia.com

रेल्वेतून होणारी सोने आणि पैशांच्या वाहतुकीची माहिती त्या तिघांना मिळाली होती. यातूनच त्यांनी लुटीचा बेत आखला. कोकण रेल्वेमार्गावरील वीर स्थानकाजवळ त्यांनी हा बेत तडीस नेला आणि एक कोटी ९० लाख रुपयांची रोकड लंपास केली. या लुटारूंना शोधण्याचे मोठे आव्हान रायगड पोलिसांनी आपल्या तपासकौशल्याने पार पाडले.

२२ सप्टेंबर २०१८ रोजी मुंबईतील झव्हेरी बाजार येथील सौरभ जैन एक कोटी ९० लाख रुपयांची रोकड घेऊन मंगळूर येथे निघाले होते. गाडी माणगाव ते वीर रेल्वे स्थानकांदरम्यान असताना ते लघुशंकेसाठी रेल्वेगाडीतील स्वच्छतागृहात गेले. तेथून परतताच आपली बॅग चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी रत्नागिरी येथे पोलिसांकडे तक्रार केली. मात्र घटना रायगड जिल्ह्याच्या हद्दीत घडली होती. त्यामुळे चार दिवसांनंतर हे प्रकरण रायगड पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.

पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी या लुटीचे गांभीर्य ओळखून हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला. चोरटय़ांसंदर्भात पोलिसांकडे कोणतीच माहिती नव्हती. फिर्यादी जैन यांच्या तक्रारीत आणि ज्या सराफाकडे ते काम करायचे त्या सराफाच्या जबाबात एकवाक्यता नव्हती. त्यामुळे पोलीस आणखी संभ्रमात सापडले. बॅगेत नेमका किती ऐवज वा रोकड होती, हे फिर्यादीला धड सांगता येत नव्हते. मात्र, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जैन यांना चुकीची माहिती दिल्याचे सोनाराने पोलिसांना स्पष्ट केले आणि बॅगेतल्या ऐवजाचा गोंधळ दूर झाला.

पोलिसांनी सोनाराच्या दुकानाभोवती असलेल्या सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या तपासणीपासून शोधकार्यास सुरुवात केली. त्यानंतर मुंबई ते रत्नागिरी दरम्यानच्या सर्व स्थानकांतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले. तपासासाठी चार पथके वेगवेगळ्या ठिकाणी पाठवली गेली. त्यांच्याकडून येणारी माहिती अलिबाग येथील मुख्यालयात संकलित केली गेली. त्या दिवशी मुंबई-मंगळूर रेल्वेवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू केली. मोबाइल फोनचा ‘डंप डेटा’ही तपासण्यात आला. या सगळय़ा तपासणीतून पोलिसांना आशेचा एक किरण सापडला. रेल्वेत त्या दिवशी दोन तरुण मुंबईहून डब्यात चढले होते. त्यातील एक जण बराच वेळ डब्यातील दरवाज्यांच्या जवळ पॅसेजमध्ये बसला होता अशी माहिती समोर आली. या माहितीचा आधार घेऊन पोलीसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. गाडीतील दोन जण सातत्याने मोबाइल फोनच्या मदतीने संपर्कात असल्याचे दिसून आले. यातील एक जण घटना घडल्यावर वीर रेल्वे स्थानकावर उतरल्याचे लक्षात आले. तर दुसरा रत्नागिरीला उतरल्याचे समोर आले.

दहा दिवसांच्या तपासानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. या प्रकरणात अमित संजय पवार, अजय संजय पवार या दोन भावंडासह प्रमोद प्रकाश पाटील या भारतीय सैन्य दलातील जवानाला अटक केली. त्यांच्याकडून १ कोटी ७८ लाख रुपयांची रोकडही पोलिसांनी जप्त केली. अजय पवार हा पूर्वी झव्हेरी बाजार येथील फिर्यादी सौरभ जैन काम करत असलेल्या ज्वेलर्सकडेच काम करत होता. त्याला रेल्वेतून होणाऱ्या सोने आणि रोख रकमेच्या वाहतुकीची माहिती होती. यातूनच त्यांनी आपला भाऊ  आणि त्याच्या मित्राच्या मदतीने हा कट रचला होता. झटपट पैसे कमवण्याचा हव्यास त्याच्या मनात घोळत होता. या हव्यासातूनच यापूर्वी दोन वेळा त्यांनी चोरीचा अपयशी प्रयत्न केला होता. मात्र, तिसऱ्या वेळेला त्यांना यश मिळाले. त्यानंतर पुण्यात जाऊन त्यांनी लुटीची रक्कम वाटून घेतली.

या प्रकरणाचा तपास करणे पोलीसांसमोर मोठे आव्हान होते. कारण कुठलाही ठोस पुरावा तिघांनी मागे सोडला नव्हता. तपासाची व्याप्ती मोठी होती. मुंबई, रायगड, रत्नागिरी मार्गे तपासाची चक्रे पुणे आणि सांगली जिल्ह्यापर्यंत जाऊन पोहोचली होती. अखेर कौशल्यपूर्ण तपास आणि अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला गुन्ह्याची उकल करण्यात यश आले. पोलीस निरीक्षक जे. ए. शेख, साहाय्यक पोलीस निरीक्षक एस व्ही सास्ते, साहाय्यक पोलीस निरीक्षक डी. जी पवार, पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग यांच्या पथकाने यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या प्रकरणात अटक करण्यात आलेला प्रमोद पाटील हा भारतीय सैन्य दलात जवान म्हणून कार्यरत आहे. दीर्घकालीन सुट्टी घेऊन तो आपल्या सांगली जिल्ह्य़ातील तासगावमधील ढवळी गावात आला होता. याच वेळी अजय पवार आणि अमित पवार यांच्या संपर्कात आला. या कटात सहभागी झाला. देशसेवा करणारा जवान चुकीच्या संगतीमुळे थेट चोरीच्या गुन्ह्यात अटक झाला..