चांगल्या खबरीसाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची पोलिसांची तयारी असते. परंतु गेल्या काही वर्षांत पोलिसांचे अतिरिक्त उत्पन्न कमी झाल्याने आता पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या ‘चिंधी’चोरीला खबरीही वैतागले आहेत. त्यामुळे त्यांनी पोलिसांपासून दूर जाणे पसंत केले आहे. विशिष्ट ‘खबरी’नुसार ‘दर’ देऊ अशी भूमिका काही पोलिसांनी घेतल्यामुळे नाराज झालेल्या खबऱ्यांनी तीव्र नापसंती वर्तविली आहे. आजही काही अधिकाऱ्यांच्या ‘दान’शूरतेमुळे खबरी टिकून असल्याचे सांगितले जाते.
गुन्हे अन्वेषण विभागात काम करणाऱ्या ‘चकमक’फेम प्रदीप शर्मा, प्रफुल्ल भोसले यांसह अनेक अधिकाऱ्यांकडे खबऱ्यांचे जाळे होते.  गुन्ह्य़ाची उकल करण्यासाठी या दोन्ही तपास यंत्रणांमध्ये अहमहमिका लागत असे. सिक्रेट फंडही त्यांच्यासाठी खुला होत असे. परंतु कालांतराने चांगली खबर आणि खबरी हा प्रकारच सध्या कमी होऊ लागला आहे. यामागे पोलिसांकडून सुरु झालेली ‘चिंधी’चोरी हेही एक कारण असल्याचे काही खबऱ्यांनी सांगितले. मात्र आजही जुनेजाणते अधिकारी चांगल्या खबरीसाठी वाट्टेल ती किंमत मोजण्यास तयार असतात, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.

गुन्हे अन्वेषणात ‘खबरी’ हा खूप महत्त्वाचा घटक आहे. खबरी हाताळण्यासाठी खास हातोटी लागते. आजही अनेक पोलीस अधिकारी खबरी बाळगून आहेत. मात्र खबऱ्यांचा दर्जाही खालावला आहे
 – हिमांशू रॉय, अतिरिक्त  महासंचालक

काही दर..
*सोनसाखळी चोरी – ६ ते ८ हजार (प्रसंगी जादा)
*अमली पदार्थ – ४ ते ५ हजार
*जबरी चोरी – ५ ते ८ हजार
हत्या, दरोडा, घरफोडय़ा – खबरीनुसार प्रसंगी जादा दर.