अटकपूर्व जामिनासंदर्भात रिव्हिजन अर्ज न दाखल करण्यासाठी एका महिलेकडून २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने बुधवारी अटक केली. प्रशांत सावंत (५०) असे या पोलीस निरीक्षकाचे नाव असून ते बोरिवली पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. एका पतपेढीत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी २०१३ मध्ये काही कर्मचाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले होते. परंतु एका महिला कर्मचाऱ्याला या प्रकरणात आरोपी करू, अशी धमकी पोलीस निरीक्षक प्रशांत सावंत देत होते. त्यामुळे या महिला कर्मचाऱ्याने उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला होता. मात्र सावंत यांनी या अटकपूर्व जामिनाविरोधात रिव्हिजन अर्ज दाखल न करण्यासाठी महिला कर्मचाऱ्याकडून २० हजारांची लाच मागितली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 11, 2015 2:51 am