महिनाअखेरीस महाराष्ट्र पोलिसांचे अ‍ॅप; चाचणी सुरू

महिला अत्याचारांवर पायबंद घालण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होत असताना राज्यभरातील महिलांना दिलासा देणारे एक वृत्त आहे. छेडछाड, लैंगिक छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरणाऱ्या महिलांना अवघ्या काही मिनिटांत पोलिसांची मदत मिळावी यासाठी ‘प्रतिसाद’ हे अ‍ॅप कार्यान्वित होणार आहे. या अ‍ॅपची चाचणी राज्यातील १५ ठिकाणी घेण्यात आली असून मार्च महिन्याअखेरीस संपूर्ण राज्यात प्रतिसाद महिलांच्या सेवेत रुजू होणार आहे.

गुन्हे घडत असताना नागरिकांनी त्याची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी यासाठी, नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. त्यातही फक्त महिला आणि बालकांशी संबंधित अत्याचारांची माहिती पोलिसांनी देऊन तातडीने मदत मिळावी यासाठी मुंबईत १०३ तर राज्यात १०९१ हा क्रमांक आहे. तंत्रज्ञानाची कास धरत संपूर्ण राज्यभर एकच असे मोबाइल अ‍ॅप असावे, ज्याच्या माध्यमातून नजीकच्या पोलीस ठाण्यात संदेश जाऊन तातडीने मदत मिळावी, असा विचार मांडण्यात आला होता. त्यावर तातडीने काम करत प्रतिसाद नावाने अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. राज्यातील १५ ठिकाणी याची चाचणी घेण्यात आली असून महिलांनी मदत मागितल्यापासून सहा ते आठ मिनिटांत पोलीस घटनास्थळी दाखल होत आहेत. महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती वेळेत मदत पोहोचणे, त्यातही अनेकदा मोबाइलवरून नियंत्रण कक्षाला संपर्क साधणे महिला अथवा पुरुषांना शक्य नसते. अशा वेळी हे अ‍ॅप नक्कीच उपयुक्त ठरेल, असे मत राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी व्यक्त केले. हे अ‍ॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर त्याचा माग काढून तातडीने त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवणे शक्य आहे. आतापर्यंत आम्ही घेतलेल्या चाचण्यांमध्ये त्याला चांगले यश मिळाले असून महिन्याअखेरीस या अ‍ॅपचे लोकार्पण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही महासंचालक दीक्षित यांनी स्पष्ट केले.

आतापर्यंत आम्ही घेतलेल्या चाचण्यांमध्ये अ‍ॅपला चांगले यश आले आहे. महिन्याअखेरीस या अ‍ॅपचे लोकार्पण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

प्रवीण दिक्षित, महासंचालक