कामाच्या ताणामुळे उद्वेग, नैराश्याची भावना; वाहनांची तपासणी थांबली

करोनाविरुद्धच्या युद्धात जिवाची बाजी लावून आघाडीवर लढणारे पोलीस दल अनेक अडचणींमुळे हतबल झाल्याचे निदर्शनास येत आहे. ‘करोनाचा संसर्ग झाला तर १४ दिवस आराम तरी मिळेल’, ही टोकाची प्रतिक्रिया म्हणजे पोलिसांतील उद्वेग आणि नैराश्याचा प्रतिध्वनी आहे. एकीकडे कामाचा ताण आणि दुसरीकडे करोनाचा धोका अशा कात्रीत सापडलेल्या पोलिसांची बंदोबस्तावरील पकड सैलावत असल्याचे चित्र आहे.

नागरिकांच्या बेशिस्तीमुळे करोनाचा फैलाव वाढू नये यासाठी पोलीस दोन महिन्यांपासून अविश्रांत बंदोबस्तावर आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, म्हणून रस्त्यावर पहारा देणाऱ्या शेकडो पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. राज्यात १६६६ पोलीस बाधित आहेत. १५ पोलिसांनी जीवही गमावला आहे.

पोलिसांमध्ये करोनाचा फैलाव झपाटय़ाने झाल्यानंतर भानावर आलेल्या सरकारने ५५ वर्षांपुढील आणि मधुमेह-रक्तदाब-हृदयरोग आदी विकारांच्या ५० वर्षांपुढील अधिकारी, अंमलदारांना घरीच थांबण्याचा आदेश काढला. परिणामी, आधीच अपुरे मनुष्यबळ असलेल्या पोलीस दलाची बंदोबस्तावरील कुमक दुबळी बनली. त्यातच बाधित आणि त्यांच्या संपर्कातील अन्य पोलिसांना विलगीकरणात जावे लागले. त्यामुळे उर्वरितांवर असह्य़ ताण आला आहे.  आपल्यामुळे कुटुंबातील लोकांना संसर्गाचा धोका आणि त्यामुळे घरात दबा धरून बसलेली भीती अशा वातावरणाचा मानसिक परिणामही पोलिसांवर होत आहे. त्याचबरोबर संसर्ग झालेल्या सहकाऱ्यांना उपचार मिळत नसल्याचे प्रकार घडल्याने पोलीस दल अस्वस्थ आहे.

काही दिवसांपूर्वी संसर्ग झाल्यानंतर मुंबईतील पोलिसाने पोलिसांवर बेतलेल्या प्रसंगाबाबत लिहिलेला विडंबनात्मक मजकूर सर्वदूर पसरला आणि बहुचर्चितही ठरला. या विडंबनात त्याने करोनाला देवदूत संबोधले होते.

वाहनांची तपासणी थांबल्यात जमा

सततचा कामाचा ताण आणि संसर्गाची भीती अशा दडपणामुळे काही पोलीस इतके धास्तावले आहेत की, काही दिवसांपासून वाहनांची तपासणी किंवा चालकाची चौकशीच केली जात नसल्याचे चित्र आहे. पूर्वी प्रत्येक टोलनाक्यावर किंवा महत्त्वाच्या चौकात पोलीस वाहने अडवून प्रवासाचे कारण, परवानगी या गोष्टी पडताळून पाहत होते. आता ही पडताळणी पूर्णपणे बंद झाली आहे, असे अत्यावश्यक सेवेसाठी नियमित प्रवास करणाऱ्या मुंबईतील एका वाहनचालकाने सांगितले.

हतबल पोलीस

* सहकाऱ्यांना करोनाची लागण होण्याचे वाढते प्रमाण

* दोन महिन्यांच्या बंदोबस्तामुळे आलेला थकवा, कामाचे अनियमित तास

* आपल्यामुळे कुटुंबीयांना संसर्गाचा धोका, घरात दबा धरून बसलेली भीती

* पोलिसांना उपचार पुरवण्यात आरोग्य यंत्रणांचे दुर्लक्ष

* टाळेबंदी मोडणाऱ्या हुल्लडबाज, बेशिस्त लोकांची अरेरावी

..तर संतापाचा उद्रेक

टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात शहरात  प्रत्येक वाहन अडवून चौकशी केली जात नाही. याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न देण्याच्या अटीवर सांगितले की, शासनाने टप्याटप्प्याने ठरावीक क्षेत्रांसाठी नियम शिथिल केल्याने टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात रस्त्यांवर वाहने जास्त प्रमाणात धावतात. दुसरीकडे नियमांची कठोर अंमलबजावणी के ल्यास नागरिकांच्या अस्वस्थतेचा, संतापाचा उद्रेक होऊ शकेल.

वाहनांची तपासणी थांबल्यात जमा

सततचा कामाचा ताण आणि संसर्गाची भीती अशा दडपणामुळे काही पोलीस इतके धास्तावले आहेत की, काही दिवसांपासून वाहनांची तपासणी किंवा चालकाची चौकशीच केली जात नसल्याचे चित्र आहे. पूर्वी प्रत्येक टोलनाक्यावर किंवा महत्त्वाच्या चौकात पोलीस वाहने अडवून प्रवासाचे कारण, परवानगी या गोष्टी पडताळून पाहत होते. आता ही पडताळणी पूर्णपणे बंद झाली आहे, असे अत्यावश्यक सेवेसाठी नियमित प्रवास करणाऱ्या मुंबईतील एका वाहनचालकाने सांगितले.