आपल्या सेवाकाळात पराक्रम गाजविणाऱ्या, उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र शासनाने शनिवारी पोलीस पदके जाहीर केली. यात राज्यातील ५४ जणांचा समावेश असून, भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी अर्चना त्यागी, संजय सक्सेना, शशांक सांडभोर, वसंत साबळे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

मुंबईत सहपोलीस आयुक्त (प्रशासन) पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अर्चाना त्यागी सध्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) अतिरिक्त पोलीस महासंचालक आहेत. राज्य पोलीस दलाचे अतिरिक्त महासंचालक (प्रशिक्षण आणि विशेष शाखा) संजय सक्सेना यांनी मुंबईच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्त पदी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. सहायक पोलीस आयुक्त सांडभोर यांनी अनेक वर्षे गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तवार्ता (सीआययु) या अत्यंत महत्त्वाच्या विभागात कार्य केले आहे. तर वसंत साबळे सातारा जिल्ह्य़ातील कोरेगाव तालुक्यात सहायक पोलीस निरीक्षक पदी कार्यरत आहेत.

याशिवाय वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अतुल पाटील, पोलीस अधीक्षक (इंटरपोल) धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त नंदकुमार ठाकूर, सहायक पोलीस आयुक्त नंदकिशोर मोरे, स्टीवन अँथनी, वरिष्ठ

पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांच्यासह ४० अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवा बाजावल्याबद्दल पदक जाहीर झाले आहे.

‘पद्मश्री’मुळे माझ्या लढय़ाची दखल घेतली गेली याचे समाधान वाटते. मात्र, ज्या दिवशी महिलांकडे माणूस म्हणून पाहिले जाईल, त्या दिवशी या पुरस्काराचा खरा आनंद वाटेल. केवळ मुस्लीम महिलाच नव्हे तर सर्वच सामाजिक स्तरांतील महिलांवर अन्याय होत आहेत, त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी, त्यांना सन्मान बहाल करण्यासाठी धर्मापलिकडे जाऊन कायदे होण्याची गरज आहे. त्या दृष्टीने सरकारने काम केले तर तो खरा पुरस्कार ठरेल.

– सय्यदभाई, माजी अध्यक्ष, मुस्लीम सत्यशोधक समाज

भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिल्यामुळे खूप आनंद होत आहे. गुरुजी, कुटुंब, आईवडिलांचा रसिकांचा, लताबाईंचा, आशाताईंच्या आशीर्वादामुळे हा पुरस्कार मिळाला. मला संधी देणारे रवींद्र जैन यांची खूप आठवण येत आहे. त्यांनी हात दिला नसता तर चित्रपटसृष्टीत आलो नसतो व हा मानही मिळाला नसता. माझे गुरुजी व मोठय़ा बहिणीने मला स्पर्धेत भाग घेण्यासाठी गळ घातली. तेथूनच सारे बदलले. मला चांगली गाणी देणाऱ्या सर्व संगीतकारांचाही या पुरस्कारात वाटा आहे.

– सुरेश वाडकर, प्रसिद्ध गायक

या पुरस्कारामुळे आपण केलेल्या कामाची, कष्टांची कुठेतरी दखल घेतली जाते असे वाटले. एड्सचे रुग्ण, एड्स क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच हे घडू शकले.

– डॉ. रमण गंगाखेडकर, राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेतील वैज्ञानिक

गेली ३० वर्षे जलसंधारण क्षेत्रात हिवरेबाजारचे गावकरी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचा हा गौरव आहे. ३० वर्षांपूर्वी जलसंधारण कामाला प्रारंभ केला. त्याला अधिकाऱ्यांची साथ मिळाली. या पुरस्कारामुळे जलसंधारण व पंचायत राज व्यवस्थेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हुरूप वाढेल.

– पोपटराव पवार, सरपंच, हिवरेबाजार

मला जो पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे, तो मी आतापर्यंत केलेल्या काळ्या आईच्या सेवेचा आहे. ‘बायफ’ संस्थेमुळे मला माझे काम सर्वांपर्यंत पोहोचवता आले. या पुरस्काराने मला व माझ्या कुटुंबाला खूप आनंद झाला आहे. मी सर्वाची आभारी आहे. मी शाळा शिकले नाही परंतु निसर्गाच्या शाळेने मला खूप काही शिकवले आणि निसर्गाची नीतिमूल्ये जपत यापुढेही कार्य करत राहीन. माझ्या आदिवासी समाज आणि तमाम अकोलेकरांच्या वतीने मी हा पुरस्कार अतिशय नम्रपणे स्वीकारते.

– राहीबाई पोपेरे, बीजमाता