जांबोरी मैदानात शिवसेनेला परवानगी नाकारली
‘संकल्प प्रतिष्ठान’ने दहीहंडी उत्सवातून माघार घेतल्यामुळे वरळीच्या जांबोरी मैदानात दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी केवळ एक तासभर उत्सवाचे आयोजन करण्याची आग्रही मागणी शिवसेना आणि भाजपकडून करण्यात आली होती. मात्र कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याच्या भीतीने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नाही. परिणामी, रविवारी सकाळी काही काळ तेथे तणावाचे वातावरण होते.
न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने जाहीर केलेल्या धोरणात स्पष्टता नसल्याने ‘संकल्प प्रतिष्ठान’ने यंदा वरळीच्या जांबोरी मैदानातील दहीहंडी उत्सवाचे आयोजन रद्द केले होते. त्यामुळे दुष्काळग्रस्तांच्या मदतनिधीसाठी मुंबईतील सर्वात कमी उंचीची पर्यावरणस्नेही दहीहंडी जांबोरी मैदानात बांधण्याची परवानगी शिवसेनचे प्रवक्ते अरविंद भोसले आणि भाजपचे संतोष पांडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वरळी पोलिसांकडे मागितली होती.
ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी उत्सवात ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यात येणार नाही, मैदानाच्या संवर्धनासाठी १० ट्रक लाल मातीची भर टाकण्याचा आणि मैदानाभोवती वृक्षारोपण करण्याचा मानस या लेखी निवेदनात भोसले यांनी व्यक्त केला होता. मात्र मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांना दहीहंडी उत्सवासाठी मैदान देण्यात आल्याने ते शिवसेना आणि भाजपला उपलब्ध करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून असमर्थता दर्शविली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून रविवारी सकाळपासूनच पोलिसांनी जांबोरी मैदानाभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. सकाळच्या वेळी मैदानात प्रवेश मनाई करण्यात आली होती.उत्सव साजरा करण्यासाठी २२ परवानग्या घ्याव्या लागतात. ‘संकल्प’ने यंदा संभ्रमामुळे उत्सवाचे आयोजन केले नाही. संभ्रम दूर झाल्यावर पुढच्या वर्षी उत्सव साजरा केला जाईल. शिवसेना आणि भाजपने केवळ राजकीय नौटंकी करीत जांबोरी मैदानात उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी मागितली होती, असे मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी सांगितले.संभ्रमामुळे यंदा गोंधळाची परिस्थिती होती. त्यामुळे आयोजक आणि पथकांची संख्या कमी होती. सत्ताधारी भाजपने आयोजन केलेल्या उत्सवातही दहीहंडीची उंची आणि १२ वर्षांखालील मुलांवर घालण्यात आलेल्या बंधनाचे उल्लंघन झाले आहे.
उकाडय़ाने हैराण
पावसाने दडी मारल्याने सध्या मुंबईतही २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. याचे भान राखत मुंबईकरांनी रविवारी दहीहंडीच्या निमित्ताने पाण्याचा अपव्यय टाळला. मात्र दिवसभर पडलेल्या कडक उन्हाचा तडका सहन करीत गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी फिरत होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 7, 2015 4:33 am