मोबाइलच्या जमान्यातही ‘खबरी’ ही पोलिसांची गरज आहेच. गेल्या काही वर्षांत आर्थिक गुन्ह्य़ांतील वाढीनंतर नेहमीच्या खबऱ्यांपेक्षा वेगळे ‘खबरी’ आवश्यक वाटू लागले. तेव्हापासूनच ‘कॉर्पोरेट खबरी’ हा प्रकार अस्तित्वात येऊ लागला. मात्र इतर खबऱ्यांप्रमाणे या कॉर्पोरेट खबऱ्यांसाठी पोलिसांना एकही पैसा खर्च करावा लागत नाही. विशिष्ट कंपनी वा व्यक्तीची खबर देऊन आपला हेतू साध्य करणाऱ्या या कॉर्पोरेट खबऱ्यांमुळे पोलिसांचे काम मात्र सोपे झाले आहे.
कॉर्पोरेट घोटाळ्याची माहिती सहसा आर्थिक गुन्हे विभागाकडे अंतर्गत कुरबुरीतूनच दाखल होत असते. आकसाने वा बदला घेण्याच्या हेतूने पोलिसांना माहिती देणारेही अनेक आहेत. त्यांची पोलिसांकडून काहीही अपेक्षा नसते. केवळ संबंधित कंपनी वा व्यक्तीवर कारवाई व्हावी, अशीच त्यांची इच्छा असते. कॉर्पोरेट घोटाळ्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित ठकसेनांचा मागोवा घेण्यासाठी अशा कॉर्पोरेट खबऱ्यांची मदत होते. यामध्ये अगदी शिपायापासून संचालकापर्यंत कुणीही असा कॉर्पोरेट खबरी असतो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
बऱ्याच वेळा कंपन्यांतील जीवघेण्या स्पर्धेतूनही पोलिसांना चांगली कॉर्पोरेट खबर मिळते. प्रामुख्याने हिऱ्यांच्या व्यवसायातील बेहिशेबी व्यवहार पोलिसांना कळणे कठीण असते. वा एखाद्या बडय़ा कंपनीतील गैरव्यवहारही अशा कॉर्पोरेट खबऱ्याशिवाय कळू शकत नाही, असे सहआयुक्त हिमांशू रॉय यांनी मान्य केले. एनएसईएलचा कोटय़वधींचा घोटाळाही अशाच एका कॉर्पोरेट खबऱ्यामुळे उघड झाल्याची कबुलीही त्यांनी दिली. या खबऱ्यांकडून मिळणारी माहिती इतकी पक्की असते की, पोलिसांना त्यांची शहानिशा करण्याचीही गरज भासत नाही. कंपनीच्या काही बेनामी गोदामांची माहितीही त्यांच्यामुळेच मिळाल्याचे रॉय यांनी स्पष्ट केले.
बडय़ा कुटुंबीयांतील संपत्तीचा वाद आणि त्यातून उद्भवणारा व्यावसायिक तंटा जेव्हा पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतो तेव्हा या कुटुंबीयांतील प्रमुखाला थेट पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलाविता येत नाही, परंतु चौकशी करणे भाग असते. अशावेळीही कॉर्पोरेट खबऱ्यांचा पुरेपूर उपयोग होतो. अशा प्रकरणांमध्ये या कुटुंबीयांशी संबंधित एखादा नातेवाईक हा पोलिसांचा कॉर्पोरेट खबरी बनतो. त्यांच्यासाठी पोलिसांना बिदागी मोजावी लागत नाही. स्पीक एशिया कंपनीचा एक मुख्य अधिकारी अनेक महिने फरारी होता. तेव्हा कंपनीच्या एका दुखावलेल्या संचालकामुळेच पोलिसांना त्याचा ठावठिकाणा कळला. अशा खबरीसाठी पोलिसांना संबंधित व्यक्तीला वेगळ्या पद्धतीने मदत करावी लागते, अशी कबुलीही एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
नोकरीवरून कमी केल्यामुळे दुखावलेले कर्मचारी, कॉर्पोरेट कंपन्यांतील स्पर्धक आणि बडय़ा कुटुंबीयांच्या संपत्तीवादातून पुढे येणारी माहिती असे कॉर्पोरेट खबऱ्यांचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. इतर खबऱ्यांप्रमाणे त्यांना पैसे द्यावे लागत नाहीत. मात्र त्यांच्यामुळे आम्हाला आवश्यक ती सर्व माहिती मिळते.
-हिमांशू रॉय, सहआयुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग.