पोलीस कर्मचाऱ्याचा दावा मोटार अपघात दावा लवादाकडून रद्द

मुंबई : नुकसानभरपाईच्या दाव्यासाठी औषधांची बिले पुरेशी नाहीत, असे निरीक्षण नोंदवत मोटार अपघात दावा लवादाने मंत्रालयाजवळील अपघातात जखमी झालेल्या पोलिसाचा नुकसानभरपाईचा दावा फेटाळला.

सुनील टिबे या पोलीस कर्मचाऱ्याने मोटार अपघात दावा लवादाकडे साडेतीन लाख रुपयांच्या विम्यासाठी दावा केला होता. त्यांच्या दाव्यानुसार, गेल्या वर्षी १४ मार्चला मंत्रालय परिसरातील रात्रीच्या वेळी नाकाबंदीदरम्यान तपासणी चुकवून पळवण्यात आलेल्या एका वाहनाचा पाठलाग करत असताना ते व त्यांचे सहकारी जात असलेल्या दुचाकीला एका टॅक्सीने धडक दिली. या अपघातात टिबे यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली. दुखापत गंभीर असल्याने बॉम्बे रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी अडीच लाख रुपये खर्च आला, असा दावा त्यांनी केला होता. तसेच दुखापतीमुळे वर्षभर सक्तीची रजा घ्यावी लागल्याने आपल्याला बढतीला मुकावे लागले, असेही त्यांचे म्हणणे होते.

लवादाने टिबे यांचा नुकसानभरपाईचा दावा फेटाळून लावला. टिबे यांनी बॉम्बे रुग्णालयातील उपचारादरम्यान त्यांना देण्यात आलेल्या काही औषधांचीच बिले सादर केली. परंतु त्यांच्यावरील उपचारासाठी हीच औषधे देण्यात आल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांनी रुग्णालयातील कोणालाही साक्षीसाठी पाचारण केले नाही वा औषधांच्या चिठ्ठय़ाही सादर केल्या नाहीत, असे लवादाने नमूद केले. आपल्याला उपचारासाठी सहा वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे टिबे यांनी म्हटले होते. मात्र, उपचार करणाऱ्या डॉक्टरला साक्षीसाठी आणता आले नाही किंवा रुग्णालयात उपचार घेतल्याची वा सोडण्यात आल्याची कागदपत्रेही त्यांनी सादर केली नाहीत, याकडे लवादाने लक्ष वेधले. त्याअभावी त्यांना अपघात होऊन दुखापत झाल्याचे म्हणू शकत नाही. परिणामी अपघातामुळे आपले खूप नुकसान झाले आणि  खूप वेदना सहन कराव्या लागल्या असे म्हणणे हेही नुकसानभरपाईसाठी पुरेसे नाही, असे लवादाने म्हटले.