बंदी घालण्यात आलेली असतानाही हॉटेलमालकाशी हातमिळवणी करून हुक्कापार्लर चालवू दिल्याच्या आरोपाखाली नरेंद्र कोलते या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केले असून त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू केल्याची माहिती सरकारतर्फे गुरुवारी उच्च न्यायालयात देण्यात आली.
न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि न्यायमूर्ती के. के. तातेड यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी झाली. त्या वेळेस सरकारी वकील धैर्यशील नलवडे यांनी ही माहिती दिली. हुक्का पार्लर मालकाशी संगनमत करून पोलिसांकडून छापा टाकण्यापूर्वी त्याला त्याबाबत सतर्क केल्याच्या आरोपाखाली कोलतेला निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, कोलते याने कर्तव्यात कसूर केली असून त्याच्यावर नेमक्या कोणत्या आरोपाअंतर्गत कारवाई करण्यात येणार हे आपल्याला पाहायचे असून त्याचा आराखडा न्यायालयात सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.  ‘क्रुसेड अगेन्स्ट टोबॅको’ या संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळी ही माहिती देण्यात आली. बंदी असतानाही ठाणे-घोडबंदर येथे ‘हॉलिवूड-१८’ हा हुक्कापार्लर चालविला जात असून त्यासाठी हुक्कापार्लर चालकांनी पोलिसांशी संगनमत केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.