पीटर मुखर्जीची सलग दुसऱ्या दिवशी कसून चौकशी
तीन लग्ने करून प्रत्येक वेळी ती लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंद्राणी मुखर्जीचे पितळ गुरुवारी उघडे पडले. सिद्धार्थ दास, संजीव खन्ना आणि पीटर मुखर्जी या इंद्राणीच्या तीन आजी-माजी पतींना खार पोलीस ठाण्यात आणून तिच्यासमोर उपस्थित करण्यात आले. त्यामुळे गेल्या दोन दशकांपासून लपवून ठेवलेले लग्न व पतींसंदर्भातील इंद्राणीचे गुपित उघड झाले आहे. दरम्यान, इंद्राणीचा सध्याचा पती पीटर मुखर्जी याची सलग दुसऱ्या दिवशी कसून चौकशी झाली. रात्री उशिरापर्यंत ही चौकशी सुरू होती.
शीना बोरा हत्या प्रकरणात इंद्राणी मुखर्जी व तिचा दुसरा पती संजीव खन्ना यांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी पीटर मुखर्जीची पुन्हा कसून चौकशी करण्यात आली. इंद्राणी, संजीव व पीटर यांना समोरासमोर बसवून अनेक प्रश्न विचारण्यात आले. इंद्राणीचा पहिला कथित पती सिद्धार्थ दास यालाही गुरुवारी सकाळी मुंबईत आणण्यात आले.
सायंकाळी त्याला खार पोलीस ठाण्यात आणण्यात आल्यानंतर इंद्राणीचे तीनही पती प्रथमच समोरासमोर आले.
सिद्धार्थ दासची डीएनए चाचणी
सिद्धार्थ दास याची कलीना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत डीएनए चाचणी करण्यात आली. शीनाचा पिता नेमका कोण, हे या चाचणीनंतरच स्पष्ट होईल. इंद्राणीशी असलेल्या प्रेमसंबंधांतूनच शीनाचा जन्म झाल्याचे यापूर्वीच दास याने सांगितले होते.वरळी पोलिसांकडे नोंदच नाही
एप्रिल २०१२ मध्ये शीना बेपत्ता झाल्यावर राहुल मुखर्जीने खार आणि वरळी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्याचा दावा केला होता. त्यामुळे पोलिसांनी वरळी पोलीस ठाण्यातील २०१२ मधील बेपत्ता लोकांच्या तक्रारी तपासल्या. त्यात राहुल मुखर्जीची तक्रार नसल्याचे स्पष्ट झाले. २०१२ मध्ये वरळी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या १२ पोलिसांचे जबाब नोंदविण्यात आले आहे. त्यांनी अशा प्रकारची कुठलीही तक्रार आली नसल्याचे सांगितले. दरम्यान, शीनाची हत्या करण्यासाठी इंद्राणीने वरळी येथील ए.एम.मोटर्स या खासगी ट्रॅव्हल्स कंपनीकडून ओपल अ‍ॅस्ट्रा गाडी भाडय़ाने घेतली होती. हत्या आणि मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर गाडी परत करण्यात आली होती. पोलिसांनी ती गाडी ताब्यात घेतली आहे. शीनाचा मृतदेह जाळण्यासाठी इंद्राणीने रायगड महामार्गावरील एका पेट्रोलपंपातून पेट्रोल विकत घेतले होते. त्या पेट्रोलपंप चालकाची जबानी पोलिसांनी नोंदवली असून तो एक महत्त्वपूर्ण पुरावा मानला जात आहे.
नात्यातील गुंतागुंतीतूनच शीनाची हत्या?
शीनाच्या हत्येमागचा संपत्तीचा वाद हे कारण पुढे येत असले तरी पूर्वाश्रमीच्या नात्यांचे रहस्य उलगडू नये, सध्याचे नाते टिकावे आणि समाजातली पत कायम रहावी, यासाठी इंद्राणीने हत्या केली असल्याची शक्यता चौकशीत समोर येत आहे. शीना इंद्राणीचा तिरस्कार करीत होती. त्यातच पीटरचा मुलगा आणि सावत्र भाऊ राहुलच्या प्रेमात शीना पडली होती. त्यामुळे दोन दशके लपवलेले बिंग फुटेल अशी भीती वाटल्याने इंद्राणीने शीनाच्या हत्येचा कट रचला असावा अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे.