धारावीत अवैध डान्स बारवर छापा; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली दौलतजादा

मुंबई : अवैध डान्स बारना अभय दिल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी आरंभलेल्या सक्त कारवाईचा परिणाम पोलीस, डान्स बार मालक-चालकांवर झालेला नाही. सोमवारी रात्री धारावीतल्या अवैध डान्स बारवरील कारवाईतून ही बाब स्पष्ट झाली.

रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी मध्यरात्री एकच्या सुमारास धारावीतल्या डिस्कव्हरी बारवर छापा घातला. बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली आठ बारबाला अश्लील हावभाव करत नृत्य करताना आढळल्या. लांडे आणि गस्तीवरील पथकाने १३ ग्राहकांसह बारच्या सहा कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. बारमधून ८५ हजार रुपये हस्तगत केली.

शहरात एकाही डान्स बारला अद्याप परवानगी मिळालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या आदेशानुसार बारमालकांनी पोलीस आयुक्तालयाकडे परवानगीसाठी केलेले अर्ज विचाराधीन आहेत. बारबंदीनंतर शहरात ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्स बार चालवण्याचा नवा पायंडा पडला.

बारबालांनाच वाद्यवृंदातील गायिका म्हणून ग्राहकांसमोर उभे करण्यास सुरुवात झाली. संधी साधून या गायिका गाणे सोडून संगीताच्या ठेक्यावर ताल धरू लागल्या. दौलतजादा होऊ लागला. आजतागायत ही पद्धत सुरू आहे.

आयुक्तपद स्वीकारल्यानंतर परवानगी असेपर्यंतच म्हणजेच ठरलेल्या मुदतीतच व्यवसाय करावा, मुदत संपली की शिस्तीत आस्थापना बंद करावी, यासाठी बर्वे आग्रही आहेत. गेल्याच आठवडय़ात त्यांनी गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गोकुळसिंग पाटील यांना सेवेतून निलंबित केले. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध डान्स बारवर गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी अनेकदा छापे घालून कारवाई केली. त्याव्यतिरिक्त अखेरच्या कारवाईतील अटक आरोपींना पोलीस ठाण्यातूनच जामीन मंजूर करण्यात आला. अशा विविध कारणांमुळे ही कारवाई केली गेली. तत्पूर्वी ताडदेव, एमआयडीसी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक आणि दोन पोलीस शिपायांवरही अशीच कारवाई करण्यात आली.

‘लोकसत्ता’ला मिळालेल्या माहितीनुसार गस्तीवरील पथकाने छापा घालण्याआधी धारावी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने डिस्कव्हरी बारची पाहणी केली होती. वेळेत बंद करा, नियमाप्रमाणे आस्थापना चालवा, अशा सूचना अधिकाऱ्याने बारचालकाला दिल्या होत्या. मात्र या अधिकाऱ्याची पाठ फिरताच तेथे डान्स, दौलतजादा सुरू झाली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित होऊनही शहरात अवैधरीत्या डान्स बार सुरू असल्याने आयुक्तांच्या कारवाईचा स्थानिक पोलिसांना आणि स्थानिक पोलिसांचा डान्स बार चालकांवर धाक नाही, अशी चर्चा सुरू आहे.

एकीकडे कठोर कारवाई, दुसरीकडे डान्स बार सुरूच ठेवण्याचा मालक-चालकांचा खटाटोप अशा परिस्थितीत स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना डोळ्यात तेल घालून बंदोबस्त करावा लागणार आहे.

अद्याप परवानगी नाहीच!

’ शहरात एकाही डान्स बारला अद्याप परवानगी मिळालेली नाही.

’ बारमालकांनी पोलीस आयुक्तालयाकडे परवानगीसाठी केलेले अर्ज विचाराधीन आहेत.