फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्लाम आणि कट्टरपंथीय विचारधारेबद्दल, जी भूमिका घेतलीय त्यावरुन त्यांचा मुस्लिम देशांमध्ये निषेध सुरु आहे. दरम्यान मुंबईत महम्मद अली रोडवर मॅक्रॉन यांचे पोस्टर चिकटवण्यात आले होते. महम्मद अली रोडवर जमिनीवर फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचो पोस्टर चिकटवण्यात आले होते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

महम्मद अली रोडवरील या प्रकाराबद्दल माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी ते पोस्टर तिथून काढले. “मुंबईत लागलेल्या या पोस्टर्सबद्दल आम्ही चौकशी करत आहोत. अशी कुठलीही घटना टाळून राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आमचे प्रयत्न आहेत” असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

गुरुवारी फ्रान्समधील नीस शहरात एका चर्चेमध्ये घुसलेल्या हल्लेखोरांने तिघांचे प्राण घेतले. या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे समर्थन केले आहे. मॅक्रॉन यांच्यावर होणारी व्यक्तीगत स्वरुपाची टीका हे आंतरराष्ट्रीय मानकांचे उल्लंघन असल्याचे भारताने म्हटले आहे.

सार्वजनिक ठिकाणी ज्या क्रूर पद्धतीने फ्रेंच शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला, त्याचाही परराष्ट्र मंत्रालयाने निषेध केला आहे. कुठल्याही परिस्थितीत आणि कुठल्याही कारणासाठी दहशतवादाचे समर्थन करता येणार नाही, असेही भारताने पत्रकात म्हटले आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जी भूमिका घेतलीय, त्यावरुन मुस्लिम देशांमध्ये मोठया प्रमाणावर संताप आहे. मॅक्रॉन यांच्याविरोधात निदर्शने सुरु आहेत.