राज्याच्या सायबर विभागाने व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांची जबाबदारी निश्चित करणारी नियमावली जारी केल्यानंतर मुंबई पोलिसांनी शुक्रवारी संवादासाठी वापर होणाऱ्या सर्वच समाजमाध्यमांबाबत निर्बंध लागू केले. या निर्बंधांचे उल्लंघन आढळल्यास भारतीय दंड संहितेतील कलम १८८नुसार गुन्हा नोंद होईल.

करोना संसर्ग, उपचार, बाधित रुग्णांबाबत अफवा, चुकीची माहिती पसरवून नागरिकांना भयभीत, संभ्रमित करण्याचे प्रकार सुरू होते. ही बाब लक्षात घेता सायबर पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, टिकटॉक या आणि अशा समाजमाध्यमांना चाळण लावून अफवा, आक्षेपार्ह मजकू र वेचून बाजूला काढत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या साहित्याने जोर धरल्याचे सायबर यंत्रणांना लक्षात आले. हा प्रसार व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सर्वाधिक घडला. सायबर महाराष्ट्रने राज्यासाठी एक नियमावली जारी करून व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांची जबाबदारी निश्चित करून दिली. मुंबई पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकत संवादासाठी वापर होणाऱ्या लोकप्रिय समाजमाध्यमांच्या हाताळणीवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला.

आदेश काय? : व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, टिकटॉक, इन्स्टाग्राम आणि अन्य माध्यमांनी चुकीची, असत्य माहिती प्रसारित करू नये, ठरावीक समाज किवा धर्माविरोधात अवमानकारक आणि द्वेषपूर्ण साहित्य पसरवू नये, नागरिकांमध्ये संभ्रम किं वा दहशत निर्माण होईल आणि शासकीय यंत्रणांबाबत नागरिकांमध्ये अविश्वासाची भावना पसरेल अशी कोणतीही कृती करू नये, असे या आदेशात नमूद आहे. हे आदेश शुक्र वारी दुपारी बारापासून २४ एप्रिलपर्यंत लागू असतील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असे पोलीस उपायुक्त(अभियान) प्रणय अशोक यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

राज्यभरात १६१ गुन्हे नोंद

सायबर महाराष्ट्रने दिलेल्या माहितीनुसार अफवा किं वा समाजात तेढ निर्माण होईल, असे साहित्य समाजमाध्यमांवरून पसरविल्याबद्दल राज्यात १६१ गुन्हे नोंदवण्यात आले. त्यापैकी ८९ प्रकरणे व्हॉट्सअ‍ॅपशी, ४१ फे सबुकशी संबंधित आहेत. या प्रकरणी आतापर्यंत ३६ आरोपींना अटक करण्यात आली असून ३३ जणांना पोलीस शोधत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपबाबतची नियमावली

* सदस्यांसाठी  : व्हॉट्सअ‍ॅप समूहात अफवा, दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे साहित्य म्हणजे मजकूर, छायाचित्र किंवा ध्वनिचित्रफीत पाठवू नये. धर्मद्वेष पसरवणारे, खात्री नसलेले साहित्य पोस्ट करू नये. खात्री नसलेले साहित्य स्वत:हून बाजूला काढावे. ते जसेच्या तसे पुढे पाठवू नये.

* अ‍ॅडमिनसाठी :  खात्रीलायक साहित्याची देवणाघेवाण करणारे जबाबदार सदस्य समूहात घ्यावेत ही समूह प्रमुखाची (ग्रुप अ‍ॅडमिन) जबाबदारी असेल. अ‍ॅडमिननने समूहातील घडामोडींवर सतत लक्ष ठेवणे, सदस्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणे बंधनकारक आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर अ‍ॅडमिनने समूहात पोस्ट करण्याचा सदस्यांचा अधिकार काढून घ्यावा. सदस्य आणि अ‍ॅडमिनने आक्षेपार्ह मजकु राबाबत तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.

या नियमांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहितेतील कलम १५३ अ आणि ब, २९५ अ, ५०५, १८८ माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ क आणि ड, आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील कलम ५४, मुंबई पोलीस कायद्यातील कलम ६८ आणि फौजदारी दंड संहितेतील कलम १४४अन्वये गुन्हा नोंद केला जाईल, असे सायबर महाराष्ट्रने स्पष्ट केले आहे.