गोवंडी येथील शिवाजीनगर परिसरात बुधवारी संध्याकाळी राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) तीन तुकडय़ांसह सुमारे दोनशे पोलिसांनी शोध मोहीम राबविली. या कारवाईत परिसरातील १२७ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. तसेच अमलीपदार्थ, अवैधरीत्या मद्य विकणाऱ्या दोन महिलांसह मुंबईतून हद्दपार करण्यात आलेले आरोपी, विविध गुन्ह्य़ांत शोध सुरू असलेल्या दोघांना अटक करण्यात आली.
परिमंडळ सहाचे उपायुक्त कृ ष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत एसआरपीएफच्या तीन तुकडय़ांसह १० वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा पोलीस ठाण्यांमधील गुन्हे प्रकटीकरण पथके , दहशतवादविरोधी कक्षाचे अधिकारी असे सुमारे दोनशे पोलीस सहभागी झाले होते.
भविष्यात घडणाऱ्या गुन्ह्य़ांना प्रतिबंध, गुन्हा करून अटक टाळण्यासाठी दडून बसलेल्या आरोपींना अटक आणि अटके नंतर के लेल्या प्रतिबंधक कारवायांना न जुमानणाऱ्या सराईत गुन्हेगारांना चाप लावणे ही त्रिसूत्री या कारवाईमागे असल्याचे उपाध्याय यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
याआधी ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाप्रकारे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. परिमंडळ सहाअंतर्गत येणाऱ्या आणि सराईत गुन्हेगारांचे अड्डे किंवा केंद्र बनलेल्या वस्त्यांमध्ये अशी कारवाई वारंवार केली जाईल. या कारवाईदरम्यान अवैध व्यवसायांवरही टाच आणली जाईल, असे उपाध्याय यांनी सांगितले. याआधी उपाध्याय आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मानखुर्द, ट्रॉम्बे परिसरातील तीन संघटित टोळ्या मोक्कान्वये (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) गजाआड केल्या आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 20, 2020 12:23 am