अभियंता इस्थर अनुह्य़ा हिच्या हत्येला १८ दिवस उलटून गेले तरी अद्याप पोलिसांना आरोपींचा सुगावा लागलेला नाही. मात्र संशयावरून चौकशीसाठी कांजूर मार्ग पोलिसांनी गुरुवारी गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या तीन रिक्षाचालकांना ताब्यात घेतले आहे. इस्थर हिच्या हत्येमागे टॅक्सी अथवा रिक्षाचालकांचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे.
दरम्यान, इस्थरचा दुसरा फोन गायब असून त्याचा क्रमांक तिच्या कुटुंबियांकडेही नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.
इस्थर अनुह्य़ा ५ जानेवारीपासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून बेपत्ता होती. १७ जानेवारी रोजी कांजूर महामार्गाजवळ तिचा मृतदेह सापडला होता. घटनास्थळावरून तिचा एक मोबाइल सापडला आहे. त्यात एक सीमकार्ड होते. दुसरे सिमकार्ड गायब आहे. परंतु अनुह्य़ाकडे आणखी एक मोबाइल फोन होता, अशी माहितीही समोर आली आहे. परंतु या तिसऱ्या मोबाइलचा क्रमांक तिच्या घरच्यांनाही माहीत नाही. आता पोलीस या तिसऱ्या मोबाइलचा शोध सुरू घेत आहेत. त्यातून बरीच माहिती मिळेल, असा विश्वास पोलिसांना वाटत आहे.
दरम्यान, अनुह्य़ा हिच्या मारेकऱ्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. मात्र यामागे रिक्षा-टॅक्सीवाल्यांचाच हात असल्याचा पोलिसांचा दाट संशय आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या तपासादरम्यान पोलिसांनी तीन रिक्षाचालकांची चौकशी केली होती. २०१२ मध्ये त्यांनी एका महिला प्रवाशाचा विनयभंग केला होता. तो गुन्हा टिळकनगर पोलीस ठाण्यात दाखल आहे. ५ जानेवारीच्या रात्री यापैकी एका रिक्षाचालकाचा वाढदिवस असल्याने त्यांनी पार्टी केली होती. त्यामुळे या तीन रिक्षाचालकांची गुन्हे शाखेने कसून चौकशी केली होती. गुरुवारी संध्याकाळी कांजूर पोलिसांनी या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
आम्ही या रिक्षाचालकांच्या डीएनएचे नमुने तपासणीसाठी पाठविणार आहोत. त्यानंतर या प्रकरणावर प्रकाश पडू शकेल, असे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी सांगितले.