पोलिसांचा चोख बंदोबस्त, मिरवणुकीतील ट्रकचालकांवरही नजर
काश्मिरमधील तणावग्रस्त परिस्थिती आणि पुण्यातील दहशतवादी कारवायांची शक्यता लक्षात घेऊन यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशीचा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. मुंबईतील सुमारे ५० हजार पोलिस यावेळी बंदोबस्ताकरिता रस्त्यावर असतील. तर यंदा प्रमुख चौपाटय़ांवर पोलिसांचे ‘ड्रोन’ कॅमेरे टेहळणीकरिता भिरभिरणार आहेत. या शिवाय सीसी टीव्हींचीही नजर विसर्जन मिरवणुकांवर असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे घातपाताची शक्यता लक्षात घेऊन आणि फ्रान्समधील ट्रक हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या ट्रक चालकांची संपूर्ण माहिती देखील पोलिसांनी गोळा केली आहे.
काश्मिरमधील तणावग्रस्त परिस्थिती व यंदा पुणे शहरात दहशतवादी कारवायांची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केल्याच्या पाश्र्वभूमीवर मुंबई शहरातही पोलिसांनी काळजी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदा चौपाटय़ांवर ‘ड्रोन’मार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे. विसर्जन सोहळ्यात मोठय़ा प्रमाणावर भाविक चौपाटीवर येतात. त्यामुळे हवाई कॅमेऱ्यांद्वारे चौपाटय़ांवर पोलिसांची नजर असेल. शिवाजी पार्क, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आदी ठिकाणी ड्रोन तैनात असतील.
फ्रान्समधील बॅस्टिली शहरात यंदाच्या जुलै महिन्यात ट्रकद्वारे करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यासारखी दुर्घटना मुंबईत होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी विसर्जन मिरवणूकीत सहभागी होणाऱ्या ट्रक चालकांचे ओळखपत्र व वास्तव्याच्या पुराव्याची माहिती गोळा केल्याचे समजते आहे. विसर्जन मार्गावर या नोंदणी असलेल्या वाहनांना परवानगी देण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
विसर्जनासाठी लाखो भाविक रस्त्यावर उतरणार असल्याने सोनसाखळी चोरी, महिलांची छेडछाड, चोऱ्या व अन्य गंभीर प्रकार होण्याची शक्यता असते. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी साध्या वेषातील पोलीस मोठय़ा संख्येने गर्दीत सहभागी होणार असल्याचे समजते.
१०० ठिकाणी विसर्जन
- गणेश विसर्जनाच्या दिवशी महानगरपालिकेच्या वतीने समुद्रकिनारे, तलाव आदी विसर्जनाच्या ठिकाणी विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
- मुंबईत एकूण १०० विसर्जनाची ठिकाणे आहेत. ३१ ठिकाणी कृत्रिम तलावांची सोय पालिकेतर्फे पुरविण्यात आली आहे.
- गिरगाव चौपाटी येथे एक नियंत्रण कक्ष, ११९ जीवरक्षक, ६ मोटरबोट, १ प्रथोमपचार केंद्र, २ रुग्णवाहिका, ८ तात्पुरती शौचालये, तसेच जुहु चौपाटीवर १ नियंत्रण कक्ष, ४ जीवरक्षक, १ मोटरबोट, १ प्रथोमपचार केंद्र, २ रुग्णवाहिन्या आणि २ तात्पुरती शौचालये बांधण्यात आली आहेत.
- मालाडमधील मार्वे बीच येथे १ नियंत्रण कक्ष, १० जीवरक्षक, ५ मोटरबोट, १ प्रथोमपचार केंद्र, १ रुग्णवाहिका दाखल करण्यात येणार आहे.
अनेक ठिकाणी शौचालये नाहीच
महापालिकेने काही दिवसांपूर्वी महिलांच्या सुविधेसाठी तात्पुरत्या शौचालयात वाढ करणार असल्याचे सांगितले होते, मात्र सपूंर्ण मुंबईत फक्त ११३ तात्पुरती शौचालये उभारण्यात आली आहेत. तर अनेक विसर्जन ठिकाणी एकही तात्पुरते शौचालय बांधण्यात आले नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 15, 2016 1:17 am