वाहनचालकांची दिशाभूल करून तसेच पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांमधील लॅपटॉप चोरणाऱ्या एका टोळीस गुन्हे शाखा ८ च्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे ११ लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून वाहनांमध्ये ठेवलेले लॅपटॉप चोरी करण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे या चोरीचा तपास गुन्हे शाखा ८ कडे सोपविण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी या टोळीच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून विविध ठिकाणी पथके पाठविली होती. या तपासानंतर पथकाने विलेपार्ले येथून समीर मोहम्मद अकबर शेख यास अटक केली. त्याचे अन्य दोन साथीदार मोहम्मद हुसेन मोहम्मद शेख आणि समीर भयानी या दोघांनाही नंतर अटक करण्यात आली. समीर शेख आणि भयानी हे अभिलेखावरील गुन्हेगार असून त्यांच्याकडून चोरीच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. वाहनचालकाचे लक्ष विचलित करायचे आणि पटकन खिडकीत हात घालून आतील लॅपटॉप पळवायचा तसेच पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांमधील लॅपटॉप चोरायचा अशी त्यांची पद्धत होती, असे फटांगरे यांनी सांगतिले.