गृहविभागातील उच्चपदस्थांची पोलिसांना सूचना
आमदारांनी पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना केलेल्या मारहाणप्रकरणी सीसीटीव्ही फूटेज नीट दिसत नसले तरी अन्य पुरावे व साक्षीदार तपासावेत, अशी सूचना गृहविभागातील उच्चपदस्थांनी केली आहे.
विधिमंडळातील घटनेचे फूटेज गृहमंत्री आर.आर. पाटील, महासंचालक संजीव दयाळ, आयुक्त सत्यपालसिंह आदींनी पाहिले. त्यात घटनेच्या वेळी कोलाहल सुरू असल्याचे दिसते. गोंधळाचे वातावरण दिसते. पण नेमक्या कोणत्या आमदारांनी मारहाण केली, हे दिसून येत नसल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले होते. या घटनेचा मुख्य पुरावा फूटेज असल्याने पोलिसांना न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यासही पंचाईत होणार आहे. पण प्रत्येक वेळी सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध असतेच, असे नाही. साक्षीदार व अन्य पुराव्यांच्या आधारे पोलीस तपास करून आरोपपत्र सादर करतात. या प्रकरणातही पोलिसांनी साक्षीदार तपासावेत. फूटेज नाही, म्हणजे गुन्हा झाला नाही, असे नाही, हे उच्चपदस्थांनी स्पष्ट केले.