महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी तयार केलेले ‘आईस’ (इन केस ऑफ इमर्जन्सी) हे सॉफ्टवेअर ‘थंड’पडले आहे. किती महिलांनी ते डाऊनलोड केले, कितीजणींना त्याचा उपयोग होतो याची माहिती दस्तुरखुद्द मुंबई पोलिसांनाच नाही. तर ‘आईस’ आमच्यासाठी फारसा महत्त्वाचा प्रश्न नाही, असे धक्कादायक विधान मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी केले.
गेल्या काही महिन्यांत महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली होती. यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी ‘नॅसकॉम’च्या मदतीने ‘आईस’ हे खास सॉफ्टवेअर विकसित केले होते. जानेवारी महिन्यात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करीत त्याचे उद्घाटनही झाले. हे सॉफ्टवेअर मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध करण्यात आले. अ‍ॅण्ड्रॉईड फोनवर ते डाऊनलोड करण्याची सोय होती. संकटग्रस्त महिलेने मोबाइलवरील बटन दाबताच या सॉफ्टवेअरमुळे तिच्या परिचितांना आणि पोलिसांना त्याची माहिती मिळाली असती आणि तिला वेळीच मदत मिळणे शक्य झाले असते. परंतु आता या ‘आईस’बाबत खुद्द मुंबई पोलीस आणि सायबर सेलही अनभिज्ञ आहे.  
पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांना याबाबत शनिवारी विचारता त्यांनीही ‘आईस’ हा प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचा नाही असे धक्कादायक उत्तर दिले. अधिकाअधिक महिलांनी ‘आईस’ डाऊनलोड करुन त्याचा लाभ घ्यावा असे मात्र सांगायला ते विसरले नाहीत. पण महिला ते डाऊनलोड करतात का, त्याचा उपयोग होतो का, ते नीट चालत आहे का याची माहिती ते देऊ शकले नाहीत.
हे सॉफ्टवेअर विकसित करणारे ‘नॅसकॉम’चे उपाध्यक्ष राजीव वैष्णव यांनीही हात वर केले आहेत.
‘आईस’ म्हणजे काय?
हे सॉफ्टवेअर मोबाइलमध्ये डाऊन लोड केल्यानंतर महिलांनी पोलिसांसह आपल्या जवळच्या दहा व्यक्तींचे क्रमांक त्यात ठेवायचे. संकटसमयी एक बटन दाबताच सेव्ह केलेल्या दहा जणांना संदेश जाईल. त्याद्वारे संकटाची सूचना त्यांना मेसेजद्वारे मिळेल. जीपीआरएस प्रणालीमुळे ती महिला कुठे आहे हे समजू शकेल. याशिवाय धोक्याचा अलार्मही वाजण्याची सोय त्यात आहे. परिणामी ही महिला संकटात असल्याचे आसपासच्या लोकांना समजू शकेल.