हर्षद कशाळकर harshad.kashalkar@expressindia.com

खोपोलीतील पटेलनगर परिसरात एका बालिकेची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले होते. सुरुवातीला हा सर्व प्रकार म्हणजे नरबळी असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे खोपोली परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि हा नरबळी नाही तर खून असल्याचे लक्षात आले.

खोपोली शहरातील शिळफाटा येथील पटेलनगर परिसरात एका चारवर्षीय बालिकेची अमानुष हत्या करण्यात आली होती. या बालिकेच्या शरीराचे तुकडे करून टाकण्यात आले होते. मुलीच्या शरीरावर चटके दिल्याच्या खुणा दिसत होत्या. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती, तणाव निर्माण झाला. अघोरी प्रकारातून हा नरबळी दिल्याची चर्चा सर्वत्र झाली. या घटनेच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. गुन्ह्य़ाची उकल करणे आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवणे असे दुहेरी आव्हान पोलिसांसमोर होते.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी खोपोली पोलिसांना तातडीने तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागालाही समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या. विभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांना तपासावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एस. हेगाजे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा सुरू केला. अलिबागवरून श्वानपथक आणि न्यायवैद्यक तपासणी पथक आणि फिंगर प्रिंट एक्सपर्टला पाचारण करण्यात आले. तपास वेगाने सुरू झाला.

सुरुवातीला मृतदेह कोणाचा आहे हे शोधणे गरजेचे होते. त्यामुळे आठवडय़ाभरात बेपत्ता मुलांची माहिती संकलित करण्यात आली. १२ फेब्रुवारीपासून याच शिळफाटा परिसरातून एक लहान मुलगी बेपत्ता असल्याचे समोर आले. पोलिसांनी तातडीने त्या मुलीचा पालकांना घटनास्थळी बोलावून घेतले. तेव्हा हा मृतदेह बेपत्ता बालिकेचाच असल्याचे समोर आले. त्यामुळे तापासाचा एक टप्पा पूर्ण झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पाठवण्यात आला. घटनास्थळावरून न्यायवैद्यक पुरावे संकलित करण्यात आले.

दरम्यानच्या काळात अलिबागहून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक दाखल झाले. त्यांनी तपासाची सूत्रे हातात घेतली. मुलीच्या वडिलांचा जबाब नोंदवून घेतला. प्राथमिक तपासात अघोरी प्रकारातून नरबळी दिला नसल्याचे समोर आले. त्यामुळे ही हत्या नेमकी कोणत्या कारणांनी झाली याचा शोध पोलिसांनी सुरू केला. बालिकेच्या घराजवळ राहाणाऱ्यांची चौकशी करण्यात आली.

ही हत्या आतिशय थंड डोक्याने करण्यात आली होती. मृतदेहाचे तुकडे करून शीर आणि धड वेगळे करण्यात आले होते. मुलीचे कपडेही इतरत्र फेकून देण्यात आले होते. त्यामुळे हा खून टोकाच्या रागातून झाल्याचे दिसून येत होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी माहिती संकलनाचे काम सुरू केले. मात्र ठोस माहिती हाती लागत नव्हती. मुलीची आई अशिक्षित आणि मुकबधिर आहे. ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण ती काय सांगते आहे, तेच पोलिसांना कळत नव्हते. त्यामुळे मुकबधिर शाळेतील शिक्षकांची यासाठी मदत घेण्यात आली. तेव्हा घराजवळ राहणारा एक तरुण सातत्याने आपल्याला त्रास देत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पोलीस तपासासाठी हा महत्त्वाचा दुवा होता.

पोलिसांनी तपासाची दिशा त्या व्यक्तीच्या दिशेने फिरवली. त्याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी चौकशी सुरू केली. मात्र प्रत्येक वेळी तो वेगवेगळी माहिती देत होता. तपासाला गुंगारा देण्याचा प्रयत्न करत होता. अखेर पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच तो वठणीवर आला आणि आपल्या काळ्या कृत्याची कबुली दिली.

घराजवळ राहणाऱ्या या विवाहित महिलेवर त्याचे एकतर्फी प्रेम होते. त्याने आपले प्रेम तिच्याकडे व्यक्त करण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. पण प्रत्येक वेळी महिलेने त्याला नकार दिला होता. यामुळे संतापलेल्या तरुणाने रागाच्या भरात महिलेच्या अल्पवयीन मुलीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. तिचे अपहरण केले. सुडाच्या भावनने पेटलेल्या आणि एकतर्फी प्रेमात झुरणाऱ्या तरुणात जणू राक्षस संचारला होता. त्याने मुलीला चटके दिले आणि गळा चिरून तिची हत्या केली. मृतदेह निर्जन ठिकाणी नेऊन टाकला. धडापासून शीर वेगळे केल्याने मृतदेहाची ओळख पटणार नाही, अशी अपेक्षा त्याला होती. पण पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली आणि चोवीस तासांच्या आत या खुनाचा उलगडा झाला.

या तपासात पोलीस उपअधीक्षक रणजीत पाटील, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख जे. ए. शेख आणि खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एस. हेगाजे यांच्या पथकांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.