येत्या १५ दिवसांत संपूर्ण कामकाज ऑनलाइन
नेहमी कागदपत्रे आणि फायलींच्या गराडय़ात असलेले पोलीस ठाणे आता ऑनलाइन होणार आहे. पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी पाठपुरावा करून अखेर गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही योजना प्रत्यक्षात आणली आहे. जूनपासून पोलीस ठाणी एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी तसेच, अहवाल-कागदपत्रे पाठविण्यासाठी या प्रणालीचा वापर करणार आहेत. तसेच, प्रत्येक पोलीस अधिकारी-कर्मचारी यांची माहिती देणारे ऑनलाइन पटलही तयार करण्यात येणार असून त्याआधारे पोलिसांच्या नेमणुकीपासून त्याच्या रजांची माहितीही ऑनलाइन असणार आहे.
एकीकडे पोलीस आयुक्त ट्विटरच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधत असताना दुसरीकडे पोलिसांचे संदेशवहन आणि माहितीचे आदानप्रदान कागदांच्याच माध्यमातून होत होते. आतापर्यंतच्या अनेक आयुक्तांनी पोलिसांचा कारभार कागदविरहित करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात काही केल्या यश येत नव्हते. मात्र, जानेवारी महिन्यात आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दत्ता पडसलगीकर यांनी त्याचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. केवळ माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी ऑनलाइन यंत्रणेचा वापर मर्यादित न ठेवता, प्रत्येक पोलीसाचे ‘बायोप्रोफाइल’ तयार करण्याचेही आदेश त्यांनी दिले होते. त्याची सुरुवात येत्या १५ दिवसांत होईल, असे आयुक्त पडसलगीकर यांनी स्पष्ट केले. कागदपत्रांच्या व्यापात न अडकता कारभार वेगवान व्हावा यासाठी हे अत्यंत गरजेचे असून ही संकल्पना लवकरच सत्यात उतरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काय आहे बायोप्रोफाइल?
बायोप्रोफाइलमध्ये प्रत्येक पोलीस अधिकारी-कर्मचारी यांची माहिती, त्याची नेमणूक त्याच्या शिल्लक रजा आणि अर्ज केलेल्या रजांची स्थिती कळण्यास मदत होईल. रजेसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे खेटे मारणेही त्यामुळे बंद होणार आहे.
कामाच्या आठ तासांची प्रायोगिक चाचणी अधिकारी-कर्मचारी यांच्या सूचनेनुसार, देवनार पोलीस ठाण्यात अधिकारी-कर्मचारी यांच्या कामाचे तास आठ तासांवर आणण्यात आले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविण्यात येत असून दीड महिन्यानंतर त्याचे निष्कर्ष, परिणामकारकता पाहून आणखी पोलीस ठाण्यात ती राबविण्याचा निर्णय घेण्यात येईल असे, आयुक्त पडसलगीकर यांनी स्पष्ट केले. कामाच्या वेळा आठ तासांवर आणण्यासाठी अनेक अडथळे असल्याचे ते म्हणाले.