विलेपार्ले येथील नामकरणाचे वास्तव उघड

साहित्यिक, कलाकारांना डावलून विलेपार्ले येथील चौकाला अज्ञात व्यक्तीचे नाव देण्यात आल्याचा निषेध पार्लेकर करीत असतानाच या चौकाच्या जागी पोलीस चौकीचे आरक्षण असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलीस चौकीसाठी दुकाने व पाणपोई हटवली जात असल्याचे चित्र निर्माण करून प्रत्यक्षात चौकाचे नामकरण केले गेल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. याविरोधात पार्लेकर एकवटले असून या अर्थपूर्ण व्यवहाराच्या निषेधार्थ आज, सोमवारी पाल्र्यातील नागरिक महापौरांची भेट घेणार आहे.

विलेपार्ले म्हणजे साहित्यिक व कलाकारांचे माहेरघर. मराठी संस्कृती व सामाजिक दायित्व जपणाऱ्या विलेपार्ले पूर्व येथील रेल्वे स्थानकाबाहेरील नेहरू रस्त्यावरील चौकाचे जानेवारीत दणक्यात नामकरण करण्यात आले. येथील पाणपोई व दोन दुकाने हटवून चौकात बाग तयार करण्यात आली व या बागेत लक्ष्मीबेन भारमल छाडवा यांचा अर्धपुतळा बसवून या चौकाला त्यांचे नाव देण्यात आले. या चौकाचे नामकरण शिवसेनेच्या तत्कालीन नगरसेविका शुभदा पाटकर यांनी केले. राज्याच्या साहित्य-संस्कृतीत मोलाचे योगदान असलेल्या पुलं, विजय तेंडुलकर, सतीश दुभाषी, चंद्रकांत गोखले, दत्ता भट, माधव वाटवे अशा पार्लेकरांना विसरून शेजारच्या रस्त्यावरील मोठय़ा शोरूमच्या मालकाच्या कुटुंबातील महिलेचे नाव या चौकाला देण्यात आल्याबद्दल पुलंचे पुतणे जयंत देशपांडे, डॉ. शशी वैद्य, प्रदीप वेलणकर, इला भाटे, आशा खाडिलकर, सचिन खेडेकर यांच्यासह अनेक पार्लेकरांनी निषेध व्यक्त केला. चौकाच्या सुशोभीकरणासाठी पाणपोई तोडल्याच्या निषेधार्थ तेथे पाणपोई चालवणाऱ्या संबंधित संस्थेने निषेधाचे फलकही लावले होते.

प्रत्यक्षात या जागी पोलीस चौकीचे आरक्षण असल्याची बाब पुढे आली आहे. महानगरपालिकेच्या २०३४ पर्यंतच्या विकास आराखडय़ात ही जागा पोलीस चौकीसाठी राखीव असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (या आराखडय़ाची प्रत ‘लोकसत्ता’कडे आहे.) पोलीस चौकीसाठी राखीव असलेल्या जागी चौकाच्या नामकरणापोटी जागा हडप करण्याचाच तर हा प्रकार नाही ना, अशी शंका पार्लेकर व्यक्त करीत आहेत. या ठिकाणी महानगरपालिकेने बुलडोझर आणून दुकान व पाणपोई पाडली. एका दुकानदाराला शेजारीच तर दुसऱ्याला समोरच्या पदपथावर जागा देण्यात आली. पदपथावरील अतिक्रमण तोडण्याचे आदेश आयुक्त अजोय मेहता यांनी दिले असताना अधिकृत परवाना असलेल्या दुकानदाराला पालिकेनेच पदपथावर जागा दिल्याबद्दल विलेपार्ले विकास मंचचे प्रमोद मुजुमदार यांनी आश्चर्य व्यक्त केले.  संबंधित चौकाच्या जागेसाठी मालमत्ता विभागाकडून भाडे घेण्यात येत होते, आता पालिकेच्या वॉर्ड कार्यालयाकडून देखभालीअंतर्गत भाडे आकारले जाते, अशी माहिती मिळाली आहे. मात्र ही जागा आमच्या विभागाकडे नव्हती, असे मालमत्ता विभागातील अधिकारी सांगत आहेत. विकास आराखडा राबवण्याची जबाबदारी विभाग अधिकाऱ्याकडे असते. कदाचित हे सुशोभीकरण तात्पुरते असेल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

आज महापौरांची भेट घेणार

विलेपार्लेकरांना अज्ञात असलेल्या महिलेचे नाव चौकाला देण्यावरून निषेध नोंदवण्यासाठी तसेच पाल्र्यात संगीतालय सुरू करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यासाठी आज, सोमवारी पार्लेकर महापौरांना भेटणार आहेत. पुलंच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार संगीतालय (म्युझिक लायब्ररी) असावे, अशी पुलंची इच्छा होती. या संगीतालयाची योजना तयार आहे. मालवीय रोडवरील उद्यानात या संगीतालयासाठी जागा दिल्यास पार्ले पंचम ही संस्था त्याची जबाबदारी घेण्यास तयार आहे, असे पार्ले पंचमचे अध्यक्ष श्रीधर खानोलकर म्हणाले.

या जागेवर अतिक्रमण होते. ते मी हटवले. तिथे सौंदर्यीकरण करावे व चौकाला नाव देण्याचा नगरसेवकांचा प्रस्ताव  होता. ती प्रक्रिया सहा महिन्यांपासून सुरू होती. ती रीतसर होऊन नाव दिले गेले. देवेंद्रकुमार जैन, के पूर्व  विभागाचे सहाय्यक आयुक्त