केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात मंत्रालयाला घेराव घालण्याची घोषणा युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली होती, पण आझाद मैदान येथेच मोर्चा रोखण्यात आला. भाजपच्या विरोधात आंदोलन अधिक आक्रमक करण्याचा निर्धार याप्रसंगी काँग्रेस नेत्यांनी केला.
दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नकार, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप आदी मुद्दय़ांवर सरकारच्या विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. मंत्रालयाला घेराव घालण्याचे जाहीर करण्यात आले होते. पण मोर्चा आझाद मैदानाच्या बाहेरच अडविण्यात आला. याप्रसंगी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी बळाचा वापर करून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक केली. तत्पूर्वी, आझाद मैदानात झालेल्या सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, युवक काँग्रेसचे अ. भा. अध्यक्ष अमरिंदरसिंग ब्रार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आदींनी भाजप सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. शेतकरी आत्महत्या करीत असताना भाजप सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्याशी प्रतारण करीत असल्याचा आरोप विश्वजित कदम यांनी केला. केंद्र व राज्यात भाजप सरकारकडून आश्वासनांची पूर्तता केली जात नाही, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.