कळवा परिसरात एका १६ वर्षीय मुलीचा जबरदस्तीने होणारा बालविवाह ठाणे पोलिसांनी रोखला. या घटनेप्रकरणी नवरदेव, त्याचे वडील, मुलीचे वडील आणि लग्न लावणारे पुरोहित यांना अटक करण्यात आली. या मुलीला दहावीची परीक्षा द्यायची होती. मात्र, त्यास विरोध करत तिच्या कुटुंबीयांनी कळवा परिसरात राहणाऱ्या राजू महंती (२८) या तरुणासोबत तिचा विवाह निश्चित केला. सायबानगर परिसरातील शिवमंदिरमध्ये बुधवारी दुपारी हा विवाह होणार होता. याविषयी तिने शाळेतील शिक्षकांना माहिती दिली होती. त्यानंतर ही माहिती एका सामाजिक संस्थेमार्फत ठाणे पोलिसांपर्यंत पोहोचली. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ, पोलीस उपनिरीक्षक कमलउद्दीन शेख यांच्या पथकाने सापळा रचला आणि या मुलीची सुटका केली.