लालबाग येथे झालेल्या दोन गटांच्या मारामारीला दंगलीचे रूप देऊन चिथावणीखोर संदेश किंवा छायाचित्रे पसरवणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे संदेश एकाच वेळी अनेकांना (बल्क) पाठविण्यात आले असून त्यामागे नियोजित कटाचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसऱ्या घटनेतील छायाचित्रे आणि चित्रफिती समाजकंटकाकडून पसरवण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून त्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.
लालबाग येथे चार जानेवारीच्या रात्री दोन गटांमध्ये किरकोळ वादावरून हाणामारी झाली. त्यामुळे काळाचौकी-चिंचपोकळी-वरळी परिसरात तणाव पसरला होता. परंतु, लालबागमध्ये जातीय दंगल उफाळली आहे, असे धार्मिक तेढ वाढवणारे संदेश व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर अशा सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून पसरवण्यात येत होते. हे संदेश अनेक दिवस पसरवले जात होते. या रात्री पाठवण्यात आलेले संदेश म्हणजे नियोजित कटाचा भाग असू शकतो, अशी शक्यता मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी वर्तवली आहे.