विधिमंडळ अधिवेशनादरम्यान  पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी आमदार राम कदम आणि क्षितीज ठाकूर यांच्याविरुद्ध ३० जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारने बुधवारी उच्च न्यायालयाला दिली. एवढेच नव्हे, तर या संपूर्ण घटनाक्रमाचे ‘सीसीटीव्ही फुटेज’ही काही दिवसांपूर्वीच पोलिसांच्या हवाली करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी जनहित याचिकेद्वारे सूर्यवंशी यांना मारहाण करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची तसेच सूर्यवंशी यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली होती. सूर्यवंशी यांना मारहाण करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याऐवजी सूर्यवंशी यांनाच निलंबित करण्यात आल्याचा मुद्दा याचिकेत उपस्थित केला होता. तसेच मारहाण करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या खंडपीठासमोर त्यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी महाधिवक्ता दरायस खंबाटा यांनी घटनाक्रमाचे ‘सीसीटीव्ही फुटेज’ ३१ मे रोजी पोलिसांच्या हवाली करण्यात आल्याचे सांगितले. सूर्यवंशी यांच्या निलंबनाच्या निर्णयाचा फेरविचार करण्यात येत असून येत्या दोन आठवडय़ात त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही खंबाटा यांनी न्यायालयाला सांगितले.
दरम्यान, खंबाटा यांनी दिलेल्या माहितीनंतर रिबेरो यांनी याचिकेत केलेल्या सर्व मागण्यांबाबत सरकारतर्फे आवश्यक ती पावले उचलली गेल्याची वा उचलली जात असल्याची बाब विचारात घेऊन न्यायालयाने रिबेरो यांना याचिका मागे घेण्याची सूचना केली. त्यानुसार रिबेरो यांच्यातर्फे याचिका मागे घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आल्यावर न्यायालयाने प्रकरण निकाली काढले.