खादीचा गणवेश शिवण्यास शिंप्यांचा स्पष्ट नकार

राज्यातील पोलिसांनी आठवडय़ातून एकदा तरी खादीचा गणवेश घालावा, असे आदेश नुकतेच राज्याच्या मुख्यालयातून काढण्यात असले तरी त्याची अंमलबजावणी मात्र कठीण दिसते. पोलिसांच्या नकारघंटेसोबत खाकी रंगाचे खादी कापड आणणार कुठून आणि त्याचा गणवेश शिवून देणार कोण, हे दोन प्रमुख प्रश्न या आदेशांना आडवे येऊ शकतात. पोलिसांचे गणवेश शिवणारे ठरावीक शिंपी मुंबईत आहेत. त्यातील काहींनी खादीचा गणवेश शिवण्यास स्पष्ट नकार दर्शवला आहे.

नागपाडय़ातील ‘रमेश अ‍ॅण्ड सन्स जेण्ट्स टेलर’कडून राज्य पोलीस दलातील आयपीएस अधिकाऱ्यांपासून शिपायांपर्यंत गणवेश शिवून घेतात. रमेश चिंतल यांनी १९६७ मध्ये व्यवसाय सुरू केला. आज त्यांची मुले सुभाष व अशोक व्यवसाय करत आहेत. महिनाकाठी ते ५००हून अधिक गणवेश शिवतात. ज्युलीओ रिबेरो यांचा गणवेश आम्ही शिवत होतो, असे सुभाष चिंतल अभिमानाने सांगतात. परंतु खादीच्या गणवेशाविषयी त्यांच्या मनात शंका आहे.

खाकी रंगाचे खादी कापड कोण आणून देणार, असा पहिला प्रश्न पोलीस मुख्यालयाने काढलेल्या आदेशावर सुभाष यांनी प्रश्न केला. ‘टेरिकॉट, टेरिवूल, कॉटनपासून इटालियन कापडापर्यंत खाकीच्या ५०हून अधिक रंगछटा आमच्याकडे उपलब्ध आहेत.  यातील काही रंगछटा आम्ही खास काम देऊन बनवून घेतो. पण खादीत खाकी रंगाच्या गडद आणि फिका अशा दोनच रंगछटा मिळतात. फारशी मागणी नसल्याने या रंगाचे खादी मिळणे कठीण. जास्तीत जास्त दोन ते तीन जणांचे कपडे मी शिवू शकेन, मात्र सर्वाना खादीचे गणवेश हवे असतील तर मी ते शिवू शकणार नाही,’ असे चिंतल यांनी स्पष्ट सांगितले.

‘टेरिकॉट किंवा अन्य प्रकारात साधारण तीन मीटर कापडातून पॅण्ट आणि शर्ट शिवले जातात. खादीत पॅण्टचे कापड जाड तर शर्टचे हलके, जाळीदार असल्याने मशीनवर शिवताना कापड वळवणे, नेमक्या घडीवर शिलाई मारणे अवघड आणि वेळखाऊ बनते.

शिवाय मशीनही बिघडते. त्यामुळे कारागीर खादीचे कपडे शिवण्यास तयार होत नाहीत. प्रत्येक वापरानंतर गणवेशाला स्टार्च करावे लागेल. घातल्यानंतर काही वेळातच गणवेश चुरतो. टेरिकॉटचा गणवेश रोज वापरला तर वर्षभर निश्चित टिकेल, पण खादीचा गणवेश तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही. खादीचे कापड लगेच सैल पडते. त्यामुळे गणवेशाचा आकार एकाच वापरात बदलणार. सततच्या वापरामुळे, धुण्यामुळे गणवेश सैल पडल्यास दुसरा शिवणे पोलीस शिपायाला परवडेल का, असे चिंतल यांनी विचारले.

कापड मिळण्याची अडचण

१९३३ पासून म्हणजे ब्रिटिशांपासून पोलीस गणवेश शिवणारे भोईवाडय़ातील पालव अ‍ॅण्ड कंपनी टेलर्सचे हेमंत पालव यांनीही  खादीची वर्दी शिवणार नाही, असे स्पष्ट केले. खादीचे खाकी रंगातले कापड मिळण्याची अडचण आहेच पण शिवून कोण देणार? अलीकडे कॉटनचे कपडे शिवले जात नाहीत, खादी तर लांबची गोष्ट आहे, असे पालव यांनी सांगितले.

गणवेशाचा भत्ता अपुरा

दोन वर्षांतून एकदा पोलिसांना गणवेश भत्ता मिळतो. तो एरवीही अपुरा असतो. त्यात खादीचा गणवेश कसा शिवणार, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. काहींनी तर हा बदल आधी अधिकाऱ्यांनी अनुसरावा, अशी सूचना केली आहे. ‘एखादी योजना टप्प्याटप्प्याने आकार घेते. वातानुकूलित कार्यालयात बसणाऱ्या अधिकाऱ्यांना खादीची सक्ती करावी.’ अशी प्रतिक्रिया एका निरीक्षकांनी व्यक्त केली.