भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या पोलिसांच्या गाडीचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एका फेरीवाल्याचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. मरिन ड्राइव्हजवळ शनिवारी रात्री हा अपघात घडला. जखमींमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. या पोलिसाला अटक करण्यात आली.
गुन्हे शाखा १ मध्ये कार्यरत असणारा मंगेश चव्हाण (४९) शनिवारी रात्री टोयाटो क्वालिस गाडीतून मरिन ड्राइव्ह येथील जमनालाल बजाज रोडवरून जात होता. गाडीत एक सहायक पोलीस निरीक्षकही बसलेले होते. मंगेश चव्हाण स्वत: गाडी चालवत होता. ११ च्या सुमारास जॉली मेकर्स इमारतीजवळून उजवे वळण घेताना गाडीचे नियंत्रण सुटले आणि गाडी पदपथावर घुसली. गाडीचा वेग इतका जास्त होता, की गाडी एका फेरीवाल्याला आणि एका १० वर्षीय मुलास धडक देत व्हिक्टोरियाला धडकली. या अपघातात फेरीवाला मोहम्मद सगीर अन्सारी (४५) यांचा मृत्यू झाला. अन्सारी आझाद मैदान येथील झोपडीत राहत होते. १० वर्षीय सुनील जैस्वाल याचा पाय या अपघातात फ्रॅक्चर झाला आहे. तो कुलाबा पालिका शाळेत चौथीत शिकतो. त्याच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्वालिस गाडी व्हिक्टोरिया गाडीला धडक देऊन थांबली. केवळ ही व्हिक्टोरिया आडवी आल्याने पदपथावरील साजिद सय्यद (३०) थोडक्यात बचावले. त्यांच्यावर किरकोळ उपचार करून सोडून देण्यात आले. मरिन ड्राइव्ह पोलिसांनी मंगेश चव्हाण यास अटक केली असून नंतर न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.