शीना बोरा हत्या प्रकरण

शीनाच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या इंद्राणी मुखर्जीला रविवारी खार पोलिसांनी तपासणीसाठी तिच्या घरी नेले. ज्या गॅरेजमध्ये शीनाचा मृतदेह असलेली गाडी ठेवली होती ती जागा इंद्राणीने पोलिसांना दाखवली. पोलिसांनी हत्येनंतरचा सारा घटनाक्रम इंद्राणीकडून जाणून घेतला. दरम्यान, इंद्राणीसह संजीव खन्ना आणि श्यामवर राय यांच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
कुठलाही कच्चा दुवा राहू नये याची पोलीस काळजी घेत आहेत. त्यासाठी रविवारी संध्याकाळी चार वाजता इंद्राणीला तिच्या वरळी येथील निवासस्थानी नेऊन चौकशी करण्यात आली. शीनाची हत्या केल्यानंतर इंद्राणीने मृतदेह गाडीत ठेवून ती गाडी वरळी येथील आपल्या इमारतीच्या गॅरेजमध्ये रात्रभर ठेवली होती. त्या गॅरेजची पोलिसांनी इंद्राणीला घेऊन पाहणी केली आणि हत्येनंतरचा घटनाक्रम समजावून घेतला. हा सर्व तपशील तपास कामात महत्त्वपूर्ण असून न्यायालयात त्यावर युक्तिवाद करता येतो, असे पोलिसांनी सांगितले. अटक झाल्यानंतर १३ दिवसांनी इंद्राणी प्रथमच आपल्या घरात गेली होती.
संध्याकाळी चार वाजता इंद्राणीला वरळीच्या घरी नेण्यात आले होते. तेथे तासभर तिची चौकशी करण्यात आली. पुन्हा खार पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पती पीटर मुखर्जी यांच्यासमेवत पुन्हा चौकशी करण्यात आली. अटकेतील तिचा दुसरा पती संजीव खन्ना व कारचालक श्यामवर राय यांच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपत आहे. इंद्राणी आणि राय यांच्या पोलीस कोठडीचे चौदा दिवस पूर्ण झाले आहेत.