वांद्रे पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले हवालदार दीपक हाटे यांचा शुक्रवारी करोनाने मृत्यू झाला. दहा दिवस शासकीय केंद्रात उपचार घेतल्यानंतर हाटे यांना घरी सोडण्यात आले होते. घरी परतल्यानंतर चार तासांतच त्यांचा मृत्यू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुंबई पोलीस दलातील मृतांची संख्या १६ झाली आहे.

हाटे वरळी पोलीस वसाहतीत वास्तव्यास होते. १८ मे ला त्यांची प्रकृती खालावली. करोनाबाधित असल्याचे स्पष्ट होताच त्यांना वरळीच्या वल्लभभाई स्टेडियम येथील केंद्रात दाखल केले गेले. दहा दिवस उपचार घेतल्यानंतर गुरुवारी रात्री त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र मध्यरात्री   त्यांचा मृत्यू झाला. हाटे यांच्याबाबतची एक ध्वनिचित्रफीत शुक्रवारी समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. या चित्रफितीत हाटे अशक्त असल्याचे स्पष्टपणे दिसते, अशी माहिती एका पोलिसाने दिली.

मुंबईत १४३७ नवे रुग्ण

मुंबईत आत्तापर्यंत १६ हजार रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारी ७१५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. शुक्रवारी मुंबईत १४३७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून बाधितांचा आकडा ३६ हजार ७१० वर गेला आहे.  शुक्रवारी मुंबईत सर्वाधिक ७१५ रुग्णांना घरी पाठवण्यात आले. गेल्या काही दिवसांत पाच हजारांहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.  शुक्रवारी ३८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून त्यात २२ पुरुष आणि १६ महिला आहेत.

अग्निशमन जवानाचा मृत्यू

अग्निशमन दलातील विलेपार्ले येथील जवानाचा शुक्रवारी करोनाने मृत्यू झाला. करोनाने आतापर्यंत अग्निशमन दलातील तीन जवानांचा बळी घेतला आहे.  अग्निशमन दलाचे २२ जवान विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात करोनाचे १० बळी

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात ३३९ नवे रुग्ण आढळले, तर १० करोनाबाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची संख्या आता सात हजार ३८४, तर मृतांची संख्या २२३ झाली आहे. ठाणे शहरात एका दिवसात तब्बल १४६ रुग्ण आढळून आले आहेत. कल्याण-डोंबिवली  ३१, अंबरनाथ २३, उल्हासनगर ३३, बदलापूर २, मीरा-भाईंदर २६ आणि ठाणे ग्रामीणमध्ये सहा नवे रुग्ण आढळले आहेत. १० जणांच्या मृत्यूमध्ये ठाणे शहरातील चार, नवी मुंबईतील दोन, मीरा-भाईंदरमधील दोन तर भिवंडी आणि अंबरनाथ शहरातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

दोन नगरसेवकोंना करोनाची लागण

ठाणे महापालिकेतील दोन ज्येष्ठ नगरसेवकांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे दोन्ही नगरसेवक गेल्या काही दिवसांपासून आपल्या प्रभागांमध्ये मदतकार्य करीत होते. यातूनच त्यांना करोनाची लागण झाल्याचे म्हटले जाते.

पनवेलमध्ये तिघांचा मृत्यू

पनवेल : तालुक्यामध्ये शुक्रवारी नवे २८ करोनारुग्ण आढळले, तर तीन जनांचा मृत्यू झाला. पालिका क्षेत्रात २५ तर ग्रामीण भागात तीन रुग्ण आढळले. मृतांमध्ये खांदेश्वर येथील ४७ वर्षीय महिला, चिखलेतील ७९ वर्षीय  व्यक्ती आणि उलवेतील २६ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. आत्तापर्यंत २२ दगावले आहेत.

उरणमध्ये पहिला बळी

उरण तालुक्यातील ५७ वर्षीय करोना रुग्णाचा पनवेल येथील रुग्णालयात शुक्रवारी मृत्यू झाला. करोनाचा उरणमधील हा पहिला बळी आहे. या रुग्णाला पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती उरणचे तालुका अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे यांनी दिली.