मुंबई : ताडदेव पोलीस वसाहतीत राहणाऱ्या एका हेड कॉन्स्टेबलच्या १६ वर्षे वयाच्या मुलाने उत्साहाच्या भरात जीप सुरू करून चौघांना उडविल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या जीपचा एक टायर पंक्चर असल्यामुळे सुदैवाने जीप वेग पकडू न शकल्याने भीषण अपघात टळला. यामध्ये चौघेही जखमी झाले असून उपचारानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. या प्रकरणी संबंधित मुलाला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे. सदर हेड कॉन्स्टेबलच्या मित्राची जीप या वसाहतीत उभी होती. या जीपची चावी घेऊन सदर मुलगा सकाळच्या सुमारास इमारतीच्या खाली आला. जीप सुरू करताच गिअरमध्ये असलेली जीप पुढे सरकली आणि त्याचा धक्का भाजी खरेदी असलेल्या सुनीता कोकरे, दुलारीबाई परदेशी, मुकेश चौधरी, सुरती या चौघांना बसला. यामुळे ते जखमी झाले. त्यांना तात्काळ नायर रुग्णालयात नेण्यात आले. दुलाईबाई हिचा पाय फ्रॅक्चर झाला तर अन्य तिघे किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी संबंधित मुलाला अटक करण्यात आली आहे.