‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमात अर्थ-कृषीतज्ज्ञ मिलिंद मुरुगकर यांचे प्रतिपादन

 मुंबई : शेतीच्या सर्वंकष विकासासाठी कोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याच हिताची धोरणे आखली पाहिजेत. त्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचविले पाहिजे. यातून संघटित क्षेत्रातील रोजगारनिर्मिती अधिक प्रभावीपणे होईल, असे प्रतिपादन अर्थ-कृषीतज्ज्ञ मिलिंद मुरुगकर यांनी गुरुवारी दादर येथे केले.

टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड आणि ‘केसरी’ सहप्रायोजक असलेला ‘लोकसत्ता विश्लेषण’ हा कार्यक्रम दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित करण्यात आला होता. ‘शेतीवरील संकट आणि तुमचं आमचं जगणं’ या विषयावर मुरुगकर बोलत होते.

मूठभर आणि सधन शेतकऱ्यांची उत्पादनक्षमता वाढविण्याऐवजी ती छोटय़ा आणि कोरडवाहू शेतकऱ्यांची वाढविली पाहिजे. स्वत:ला शेतकऱ्यांचे नेते म्हणवून घेणारे जे नेते किंवा राजकारणी आहेत ते केवळ सधन आणि मूठभर शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात, असे सांगून मुरुगकर म्हणाले, मुंबईत शेतकऱ्यांचा जो ‘एल्गार’ मोर्चा आणण्यात आला होता ती माझ्यासाठी क्रांतिकारी घटना आहे. त्या मोर्चाच्या निमित्ताने बहुसंख्य शेतकरी किती गरीब आहे ते मुंबईकरांना पाहायला मिळाले. शेतीचा विकास म्हणजे औद्योगिकक्षेत्राचा विकास होण्याची पूर्वअट असून संपत्ती निर्माण करण्याचे मोठे तंत्र शेतीत आहे. ते वाढविण्याची आवश्यकता असून तसे झाले तर बहुसंख्य लोक जे शेतीवर अवलंबून आहेत ते शेतीतून बाहेर पडण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होईल.

अमेरिका-कॅनडा आणि चीन या देशांनी शेती विकासाला अग्रक्रम दिला. शेतीमध्ये संशोधन, सिंचन यावर भर देऊन शेतीची उत्पादकता वाढविली त्यामुळे कमी किमतीत निर्यात करणे शक्य झाले. शेतीमधील उत्पादकता फक्त शेतीमधील रोजगार वाढवत नाही तर आजूबाजूच्या लोकांच्या जीवनावरही त्याचा चांगला परिणाम होतो. भारतात निम्मी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, पण देशाच्या एकूण संपत्तीत त्याचे योगदान अवघे १५ टक्के असल्याचेही ते म्हणाले. प्रगत देशात शेतीवर अवलंबून असणारी लोकसंख्या अवघी तीन ते पाच टक्के आहे, तर गरीब देशात मात्र हेच प्रमाण ७० टक्के इतके आहे. शेती प्रश्नाचे खरे मूळ शेतीवर लोकसंख्येचा अधिक भार पडलेला आहे हे भारतात सर्वात जास्त लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, हे की शेतीचा विकास झाला नाही म्हणून शेतीवर सर्वात जास्त लोक अवलंबून आहेत यात आहे, असा सवाल करून मुरुगकर म्हणाले, २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शेती, रोजगारनिर्मिती हाच महत्त्वाचा मुद्दा असला पाहिजे. संघटित आणि असंघटित क्षेत्र असे भारतातील रोजगाराचे क्षेत्र असून फक्त आठ टक्के लोक संघटित तर ९२ टक्के लोक असंघटित क्षेत्रात आहेत. या असंघटित क्षेत्रात खूप मोठा भाग शेतीक्षेत्राचा आहे. शेतीकडे भावनिक दृष्टीने नव्हे तर रोजगार आणि त्यातून संघटित क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात रूपांतर या दृष्टीने पाहिले पाहिजे, असे आवाहनही मुरुगकर यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ साहाय्यक संपादक दिनेश गुणे यांनी केले.