संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची माहिती
सैन्याच्या सशस्त्र दलात आता महिलांनाही संधी कशी देता येईल यावर विचार विनिमय सुरू असून त्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी मुंबईत दिली.
माटुंगा येथील वेलिंगकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सैन्यदलातील निवृत्त अधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात दिवंगत लेफ्टनंट दिलीप गुप्ते यांच्या पन्नासाव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. भारत-पाकिस्तानच्या युद्धात ११ ऑक्टोबर १९६५ रोजी गुप्ते यांना वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी वीरमरण प्राप्त झाले होते.
हवाई दलाचे प्रमुख अरुप शहा यांनी भारतीय वायुदलात लढाऊ विमानांवर वैमानिक म्हणून महिलांना संधी देण्याबाबतचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी संरक्षण मंत्रालयाकडे पाठवला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मुलगी वाचवा मुलीला शिकवा’, ‘मुलीबरोबर सेल्फी’ अशी चळवळ सुरू केली आहे. मात्र असे असले तरी काही जणांची पुरुषी मानसिकता अद्यापही बदललेली नाही, अशी खंत व्यक्त करून पर्रिकर म्हणाले, पंतप्रधानांनी सुरू केलेली ही चळवळ फक्त स्त्री-पुरुष समानता एवढय़ापुरतीच मर्यादित नाही तर समाजात याबाबतीत जो भेदभाव दिसून येतो त्यात बदल होण्यासाठीही तेवढीच महत्त्वाची आहे. हवाईदल प्रमुख अरूप शहा यांनी महिलांना लढाऊ विमानाच्या पायलट म्हणून सहभागी करून घेण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच केली होती.