शरद पवार, पुतणे अजित पवार आणि कन्या सुप्रिया सुळे हे राजकीय क्षेत्रात विविध पदे भूषवीत असताना आता पवार कुटुंबीयातील तिसऱ्या पिढीची राजकीय महत्त्वाकांक्षा बळावली आहे. तिसऱ्या पिढीतील एकाला खासदारकी तर दुसऱ्याला आमदारकीचे वेध लागले आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीत शरद पवार हे माढा तर सुप्रिया सुळे या बारामती मतदारसंघातून निवडणूक लढविणार हे आता स्पष्ट झाले. याच वेळी मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हेसुद्धा प्रयत्नशील होते. एकाच वेळी किती पवार ही  निवडणूक लढविणार अशी चर्चा राष्ट्रवादीत सुरू झाली आहे. शरद पवार यांचे बंधू राजेंद्र पवार यांचे पुत्र रोहित पवार यांचीही राजकीय महत्त्वाकांक्षा बळावली आहे.

मावळ मतदारसंघातून उमेदवारी मिळेल या आशेवर पार्थ पवार यांनी तयारी सुरू केली. मतदारसंघात सर्वत्र पार्थ पवार यांचे फलक झळकले होते. २००९ आणि २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेने मावळमध्ये विजय संपादन केला होता. शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे मावळचे लोकसभेत प्रतिनिधित्व करतात.

पुत्र पार्थ यांना उमेदवारी मिळावी, अशी अजितदादांची इच्छा आहे. पण काका शरद पवार आणि चुलत बहीण सुप्रिया निवडणुकीच्या रिंगणात असतानाच शेजारील मावळमध्ये मुलाला उभे करणे कितपत योग्य होईल, असा अजितदादांपुढे प्रश्न आहे. एकाच वेळी घरातील किती जणांनी लढायचे, अशी शरद पवार यांचीही भूमिका आहे. पार्थ पवार मात्र माघार घेण्याच्या मन:स्थितीत नाही, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येते. शरद पवार यांनी माढामधून लढण्याचा निर्णय जाहीर केल्याने पार्थच्या उमेदवारीचा मुद्दा संपुष्टात आल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात येते. स्वत: पवार लढले नसते तर पार्थच्या उमेदवारीचा विचार झाला असता.

पार्थ पवार यांच्याप्रमाणेच रोहित पवार यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे वेध लागले आहेत. बारामती मतदारसंघात अजित पवार आणि सुप्रिया सुळे असल्याने आपला निभाव लागणार नाही हे ओळखून रोहित यांनी नगर जिल्ह्य़ातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात तयारी केली आहे. या मतदारसंघातील खासगी साखर कारखाना त्यांच्या ताब्यात आहे. नगर जिल्ह्यात उसाला सर्वाधिक दर रोहित यांच्या कारखान्याकडून दिला जातो.