मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालांबाबत लोकांची उत्सुकता ताणली गेली असतानाच या निवडणुकीतील मतकौलांचा अन्वयार्थ ‘लोकसत्ता’च्या पानोपानी शुक्रवारच्या अंकात उलगडणार आहे. त्यासाठी मातब्बर राजकीय विश्लेषक, अभ्यासक आणि सजग कलावंतांचा सहभाग लक्षणीय ठरणार आहे.

भारतीय राजकारणाचा विशेष अभ्यास असणारे ख्रिस्तॉफ जेफरलेट हे या निवडणुकीतून समोर आलेल्या राजकीय वास्तवाचा अर्थ मांडणार आहेत. जन्माने फ्रेंच असलेले जेफरलेट हे राज्यशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक असून आशिया आणि त्यातही प्रामुख्याने भारत आणि पाकिस्तानातील राजकीय स्थित्यंतरे हा त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचा प्रांत आहे.

राजकीय भाष्यकार सुहास पळशीकर यांचे चिंतनशील लेखन हे या अंकाचे वैशिष्टय़ ठरणार आहे. पळशीकर हे ‘स्टडीज इन इंडियन पॉलिटिक्स’ या राजकीय प्रवाहांच्या अज्ञात पैलूंचा शोध घेणाऱ्या द्वैवार्षिकाचे संपादक तसेच राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’चे ते नियमित लेखकही आहेत. राजकीय अभ्यासक आणि सक्रीय राजकारणी योगेंद्र यादव, उद्योजक दीपक घैसास, सामाजिक अंगाने राजकारणाचा अभ्यास करणारे विश्लेषक प्रकाश पवार तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचाही या अंकात विशेष लेखनसहभाग राहाणार आहे.

भाजपच्या परदेश धोरणगटात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे तसेच अनिवासी भारतीय आणि भाजपमध्ये महत्त्वाचा दुवा असलेले स्वयंसेवक विजय चौथाईवाले हे गेल्या पाच वर्षांतील अनुभव आणि या निवडणुकीचे निकाल यांच्या अनुषंगाने लिहिणार आहेत.

नाटय़-चित्रपट क्षेत्रांतील नामवंताचाही या अंकात सहभात आहे. अभ्यासू दिग्दर्शक विजय केंकरे, सामाजिक जाणिवेचे प्रगल्भ अभिनेते अतुल कुलकर्णी आणि अभिनेत्री शुभांगी गोखले हे या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आपल्या मनातील भावना व्यक्त करणार आहेत.