२४२२ फलकांवर कारवाई; अवघ्या ११२ जणांविरुद्ध गुन्हे

पक्षातील, संघटनेतील, परिसरातील वजन वाढविण्यासाठी रस्त्यांवर जिथे-तिथे फलकबाजी करून शहर विद्रूप करणाऱ्या राजकीय नेते, कार्यकर्ते, कृपाभिलाषी आदींनी फलकबाजीवरील बंदी गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. म्हणूनच मुंबई फलकमुक्त करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही शहरात बिनदिक्कत फलकबाजी सुरू आहे. जानेवारी ते मे २०१७ या पाच महिन्यांच्या कालावधीत पालिकेच्याच दृष्टीला तब्बल ३५१७ फलक पडले आहेत. त्यातील ११२ जणांवर पालिकेने गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय गल्लीबोळात जी फलकबाजी सुरू आहे ती वेगळी.

दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, राजकीय पक्षांचे कार्यक्रम, जाहीर सभा, नेते आणि पदाधिकाऱ्यांचे वाढदिवस आदींच्या निमित्ताने मुंबईमध्ये मोठय़ा प्रमाणावर फलकबाजी करण्यात येते. याशिवाय काही ठिकाणी व्यावसायिक आणि धार्मिक फलक झळकविण्यात येतात ते वेगळे. मुंबईच्या होणाऱ्या विद्रूपीकरणाची दखल घेत उच्च न्यायालयाने मुंबई फलकमुक्त करण्याबाबत धोरण आखण्याचे आदेश पालिकेला दिले. इतकेच नव्हे तर असा बेकायदा फलकांवर ज्या ज्या म्हणून मंत्र्यांचे, नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे चेहरे झळकले असतील त्यांच्यावरही कारवाई करण्यास न्यायालयाने सांगितले होते. न्यायालयाचे आदेश मिळताच पालिकेने दोन दिवस अखंड कारवाई करीत मुंबईतील ठिकठिकाणचे फलक हटविले. फलकांबाबत धोरण आखून प्रशासनाने राजकीय फलकबाजीवर बंदी घातली होती. राजकीय फलकांवर बंदी असतानाही राजकीय मंडळी पालिकेच्या नाकावर टिच्चून शहरभर फलक लावत आहेत. असे तब्बल २४२२ फलक पाच महिन्यात पालिकेला सापडले आहेत. परंतु, एकूण फलकांच्या तुलनेत पालिकेने केवळ ७२६ फलकांबाबतच पोलिसांत तक्रार केली आहे. त्यापैकी केवळ ११२ जणांवरच गुन्हा दाखल झाला आहे.

न्यायालयाच्या कठोर आदेशानंतर काही दिवस फलकबाजीला आळा बसला होता. या फलकबाजीवर अनेक सार्वजनिक उत्सव मंडळांची आर्थिक रसद अवलंबून असते. ती तुटल्याने मंडळांचे गणित बिघडले. परंतु, कालौघात मुंबईमध्ये पुन्हा एकदा मोठय़ा प्रमाणावर फलकबाजी सुरू झाली आहे. पालिकेने आपल्या धोरणात राजकीय फलकबाजीवर बंदी घातली असली तरी विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आजही बिनदिक्कतपणे मुंबईत फलक झळकवीत आहेत. धार्मिक, व्यावसायिक फलकांच्या तुलनेत राजकीय फलकांची संख्या प्रचंड आहे. जानेवारी ते मे २०१७ या काळात मुंबईत लागलेल्या ३५१७ फलकांवर कारवाई करीत पालिकेने ते काढून टाकले आहेत. मात्र दहिसर, मुलुंडपासून ते कुलाबा, चर्चगेटपर्यंत पसरलेल्या मुंबईत याहून किती तरी अधिक संख्येने बेकायदा फलक असण्याची शक्यता आहे. परंतु, पालिकेने त्याकडे कानाडोळा केल्याचे निष्पन्न होत आहे.

राजकीय फलकच अधिक

कारवाई केलेल्या ३५१७ फलकांमध्ये तब्बल २४२२ राजकीय फलक, पोस्टर आणि पक्षांचे झेंडे आदींचा समावेश होता. तसेच ४४८ व्यावसायिक, ६४७ धार्मिक फलकांवरही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई विद्रूप करणाऱ्या केवळ ७२६ फलकांसंबंधात पालिकेने पोलिसांत तक्रार केली आहे. तर त्यापैकी केवळ ११२ जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते शरद यादव यांना माहितीच्या अधिकार उपलब्ध झाली आहे.

फलकांवरील मान्यवरांचे काय?

न्यायालयाच्या आदेशानुसार बेकायदा फलकांवर जे मंत्री, नेतेगण किंवा कार्यकर्त्यांची छबी झळकेल त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी थेट कार्यकर्त्यांना समज देत यापुढे बेकायदा फलकांवर आपले छायाचित्र झळकल्यास त्यास आपण जबाबदार नसू, असे पत्र लिहून समजही दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी न्यायालयात याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केले होते. परंतु, नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी न्यायालयाचे आदेश गांभीर्याने घेतल्यासारखी परिस्थिती शहरभर दिसत नाही. अजूनही अनेक बेकायदेशीर फलकांवर पक्षांच्या प्रमुखांचे, मंत्र्यांचे छायाचित्र झळकताना दिसते. त्यामुळे पालिकेने ज्यांच्यावर कारवाई केली त्यात खरे तर मोठय़ा राजकीय नेत्यांचाही समावेश असायला हवा. परंतु, नेमकी कुणावर कारवाई झाली हे स्पष्ट झाले नसल्याने ही माहिती सध्या तरी गुलदस्त्यात आहे.