लोकसभा निवडणुकांचा कालावधी जवळ येऊ लागताच ठाण्यात राजकीय कुरघोडय़ांना ऊत आला असून महापालिकेमार्फत घोडबंदर मार्गावरील ढोकाळी परिसरात ऊभारण्यात आलेल्या क्रिडा संकुलाचा शुभारंभाचा कार्यक्रम पुढे ढकलून शिवसेनेने राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीवर गदा आणल्याने या दोन्ही पक्षांमध्ये नवा संघर्ष उभा ठाकला आहे. या क्रिडा संकुलाचे नामकरण ‘शरदचंद्रजी पवार क्रीडा संकुल’ असे करण्यात आले असून त्यासाठी खासदार संजीव नाईक यांचा सुमारे पाच कोटी रुपयांचा खासदार निधी वापरण्यात आला आहे. निवडणुका जाहीर होण्यापुर्वी या संकुलाच्या शुभारंभाचा बार उडवून देण्याचे बेत आखत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी येत्या शनिवारी (८ फेब्रवारी) शरद पवार यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा बेत आखला होता. त्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठाणे शहरात जोरदार बॅनरबाजीही सुरु केली होती. हे लक्षात येताच खडबडून जागे झालेल्या शिवसेनेच्या महापौरांनी हा कार्यक्रम पुढे ढकलत राष्ट्रवादीचे मनसुबे उधळून लावले आहेत.
ढोकाळी परिसरातील राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक संजय भोईर यांच्या प्रभागात महापालिकेने सुमारे २५ कोटी रुपयांचा खर्च करुन संकुल उभे केले आहे. महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी स्वत पवार यांना कार्यक्रमाचे निमंत्रण धाडले. मात्र, शक्तीप्रदर्शनाचा अंदाज येताच खडबडून जागे झालेल्या शिवसेना नेत्यांनी महापौरांमार्फत हा कार्यक्रम पुढे ढकल्याचा निर्णय घेत राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.  महापौरांनी घेतलेल्या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते संतापले असून काहीही झाले तरी पवारांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ सोहळा होईल, असे आव्हान विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी शिवसेनेला दिले आहे. तर महापौरांच्या संमतीशिवाय हा कार्यक्रम आयोजित करण्याचे अधिकार महापालिकेस नाहीत, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.