राजकीय संरक्षणामुळेच पुण्यात टोळीयुद्धाने उच्छाद मांडला असून गजा मारणे टोळीच्या ९ गुंडांच्या तडीपारीला आधीच्या सरकारच्या काळात राजकीय नेत्यांच्या सूचनेवरून गृहखात्याने स्थगिती दिली, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या नावाचा उल्लेख न करता कोणी संरक्षण दिले, हे सर्वाना माहीत आहे आणि त्यांना या गुंडांविषयी प्रेम का वाटले, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, असा प्रश्न आम्हाला विचारण्याऐवजी त्यांनीच याचे उत्तर द्यावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कितीही दबाव आला, तरी गुन्हेगारांना संरक्षण दिले जाणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या एक तासाच्या भाषणात पुण्यातील संघटित गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली. जमिनीला सोन्याचा भाव आला आहे, त्यामुळे तेथे संघटित गुन्हेगारी वाढली आहे. राजकीय संरक्षणाखेरीज हे गुंड मोठे होत नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
प्रत्येक पोलीस ठाण्यात महिलांविषयीच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्याची  तसेच प्रत्येक गुन्हा नोंदविला जावा, त्याची दखल घेतली जावी यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.
गुन्हेगारांवर कायद्याचा वचक राहावा, यासाठी त्यांच्या शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. गुन्हय़ाचा तपास चांगल्या पद्धतीने व जलद करणाऱ्या अधिकाऱ्यास पारितोषिक देण्याची योजना राबविली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेताना वेगवेगळ्या प्रकारच्या वाढलेल्या गुन्हय़ांचा उल्लेख करीत मुख्यमंत्र्यांनी कडक कारवाई केली जाईल आणि जलदगती न्यायालयात खटला चालविला जाईल, असे पालुपद लावले.

*पोलीस गृहनिर्माणासाठी ५०० कोटी रुपये कर्ज
*दोन ठिकाणी फोरेन्सिक प्रयोगशाळा
*पोलिसांनी गरीब व श्रीमंत तक्रारदारांमध्ये भेद करू नये
*पासपोर्टसाठी चारित्र्याचा दाखला, उत्सव परवानगी यांसारख्या बाबींसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात सिंगल विंडो सिस्टीम
*पोलीस तपासामध्येही कायदेतज्ज्ञांचे मार्गदर्शन

शासनाला गोडसेंचे गौरवान्वयन मान्य नाही
‘राज्य शासनाला नथुराम गोडसे यांचे गौरवान्वयन मान्य नाही’, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. त्यांच्या या उत्तराने विरोधी बाकावर स्तब्धता पसरली. विधानसभेत प्रश्नोत्तराचा वेळ संपल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेसंबंधीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणे सुरू करताच राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड थेट अध्यक्षांपुढील हौदात गेले आणि आसनासमोर उभे राहून बोलू लागले. अखेर अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना बसण्यास सांगून आव्हाडांना त्यांच्या आसनावर जाऊन बोलण्यास परवानगी दिली. तेव्हा, नथुराम गोडसेचा जन्म दिवस पनवेलमध्ये शौर्यदिवस म्हणून साजरा केला गेला. हे सरकार आल्यापासून असे प्रकार वाढीस लागले आहेत. सरकारकडून उत्तर हवे आहे, असे ते आवेशात बोलले. आव्हाड खाली बसताच लगेचच मुख्यमंत्री उठले. आव्हाडांपेक्षा अधिक जोशात त्यांनी ‘या राज्य शासनाला नथुराम गोडसे याचे गौरवान्वयन मान्य नाही. ते मारेकरी आहेत. त्याचे गौरवान्वयनाचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. कारवाई होईल’ असे स्पष्ट केले.