शिवसेना-काँग्रेस विरुद्ध मुनगंटीवार वाक्युद्धाचा भडका

अवनी वाघिणीच्या शिकारीनंतर सत्ताधारी विरुद्ध सत्ताधारी आणि सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण खदखदू लागले असून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आरोप आणि टीकेच्या फैरी झडू लागल्या आहेत. भाजपचा सत्तामित्र असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अवनीच्या शिकारीची सुपारी देणारेच चौकशी समितीवर असल्याचा आरोप करीत ही समिती म्हणजे देखावा असल्याचे रॉकेट भाजपवर सोडले आहे. त्यात काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी, मुनगंटीवार यांचे तस्करांशी संबंध असल्याचा फटाका फोडून खळबळ उडवून दिली आहे. मुनगंटीवार यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावत उद्धव यांनाही प्रतिआव्हान दिले आहे.

सत्ताधारी युतीमधील शिवसेनेने भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री मुनगंटीवार यांच्यावर नेम धरला आहे. अवनीच्या शिकारीची सुपारी देणारे या प्रकरणाच्या चौकशी समितीवर आहेत. त्यामुळे निवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. त्याला उत्तर देताना खुद्द उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची आपली तयारी असल्याचे खोचक वक्तव्य मुनगंटीवार यांनी केले. त्यांना शिवसेनेने जशास तसे उत्तर देताना आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या मुनगंटीवार यांनी उद्धव यांची समिती नेमण्याच्या वल्गना करू नयेत, असा पलटवार केला. दिवाळी संपली असली तरी राजकीय फटाक्यांची आतषबाजी मात्र आता सुरू झाली आहे. हे दोन्ही पक्षांनी परस्परांवर आरोप आणि टीकेच्या रॉकेटचा मारा करीत असल्याचे चित्र आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघिणीला गोळ्या घातल्या नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनमंत्र्यांची पाठराखण केली. मग सर्जिकल स्ट्राइक काय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता का? मग त्याचे श्रेय कसे घेतले? या पापाचे धनी तुम्ही होणार का, असा शब्दांत उद्धव यांनी भाजपचा समाचार घेतला.

उद्धव ठाकरे यांच्या या टीकेनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी त्यास प्रत्युत्तर दिले. वाघिणीच्या मृत्यूप्रकरणी काही चुकीचे किंवा शंकास्पद असेल तर आम्ही उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमू शकतो. ते जर तयार असतील तर हे आम्ही करू शकतो, असा खोचक प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे. उद्धव हे युती सरकारचे महत्त्वाचे नेते आहेत. चौकशी समितीचे प्रमुखपद त्यांनी न स्वीकारल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या पाच निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी समिती नेमण्याची विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली आहे. विनाकारण यात हीन दर्जाचे राजकारण केले जात आहे, असा प्रत्यारोपही मुनगंटीवार यांनी केला.

मुनगंटीवार यांनी उद्धव यांना प्रत्युत्तर देताच शिवसेनेने पुन्हा पलटवार केला. उद्धव यांना वाघ आणि जंगल या दोन्ही विषयांची सखोल माहिती आहे. ते टी१ वाघिणीची हत्या कशी झाली याची सखोल चौकशी करतील आणि खऱ्या गुन्हेगारांना सगळ्यांसमोर आणतील. मात्र वनमंत्री मुनगंटीवार यांच्यावर वाघिणीच्या हत्येचा आरोप आहे आणि ज्यांच्या कार्यकर्तृत्वाची चौकशी करण्यासाठी समिती नेमून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे त्यांनी उद्धव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याच्या वल्गना करू नयेत, असा प्रतिहल्ला शिवसेनेच्या प्रवक्ता डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चढवला. समितीचा अध्यक्ष ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यांच्या अधिकारांवर वनमंत्री गदा आणत आहेत का? असा सवालही गोऱ्हे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली तर सत्य काय आहे ते बाहेर येईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

मुनगंटीवार यांचे माफियांशी संबंध – संजय निरुपम यांचा आरोप

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आंतरराष्ट्रीय शिकारी-तस्कारांच्या टोळीत सामील असावेत. ते वनमंत्री झाल्यापासून वाघ मारण्याच्या संख्येत वाढ झाली आहे, असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी शनिवारी केला.

अवनी वाघिणीच्या हत्येप्रकरणी मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे आणि त्यांच्यावर कारवाई करावी. या शिकार प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणीही निरुपम यांनी केली आहे.

राज्यात भाजप सत्तेत येताच २०१५ मध्ये १४ वाघांचा मृत्यू झाला. २०१६ मध्ये १६ आणि २०१७ मध्ये २१ वाघांचा मृत्यू झाला. यात काही वाघांचा नैसर्गिक मृत्यूही झाला असावा. पण वाघांना ठार मारल्याच्या घटना पाहता मुनगंटीवार हे शिकार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय माफियांच्या टोळीत सामील असावेत, असे विधान निरुपम यांनी केले आहे. मुनगंटीवार यांची कारकीर्द पाहता वनांचे आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यापेक्षा त्यांना मारण्यातच त्यांना रस असावा, असे दिसते, असेही निरुपम पत्रकार परिषदेत म्हणाले. या पत्रकार परिषदेत संजय निरुपम यांच्यासह टीव्ही अभिनेत्री आणि प्राणीप्रेमी रुपाली गांगुली, प्राणीप्रेमी भरत शर्मा, अनुपमा मुखर्जी आणि प्रियांका टिम्मिन्स उपस्थित होत्या.

गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये संपूर्ण देशभरातील व्याघ्र अभयारण्यात वाघांच्या संरक्षणासाठी इलेक्ट्रॉनिक सव्‍‌र्हेलन्स सिस्टम बसवण्यात आली, पण महाराष्ट्रामध्ये ती यंत्रणा बसवण्यात आलेली नाही. गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रामध्ये दोन वेळा निविदा काढण्यात आली. पण दोन्ही वेळेला ती रद्द करण्यात आली. वनमंत्री मुद्दाम असे करत आहेत, की त्यांना ही यंत्रणा बसवायचीच नाही हाही चौकशीचा मुद्दा आहे. ही यंत्रणा महाराष्ट्रातील जंगलांमध्ये असती तर २०१६-१७ दरम्यान ३७ वाघांचा मृत्यू झाला नसता, असे निरुपम म्हणाले.

सध्या महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये अवैध शिकारीचे प्रमाण वाढत आहे. जनावरांच्या अवयवांची तस्करी करणारे सक्रिय आहेत. एका मेलेल्या वाघाचे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ५० हजार डॉलर मिळतात, असेही संजय निरुपम यांनी सांगितले.

संजय निरुपम यांच्यावर – दावा ठोकणार- मुनगंटीवार

काँग्रेसनेते संजय निरुपम यांनी तस्करांशी जोडलेले माझे संबंध म्हणजे राजकीय हीनतेचा कळस आहे. इतक्या खालच्या स्तराला जाऊन केलेले तथ्यहीन आरोप मी आजवर कधीही कोणावर झालेले ऐकलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर चंद्रपूर जिल्हय़ात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी सांगितले.

अवनी वाघिणीच्या मृत्यूसंदर्भात निरुपम यांनी केलेले गंभीर आरोप मुनगंटीवार यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले की, आदिवासी कुटुंबाचे दु:ख लक्षात न घेता निरुपम यांनी राजकारणात अतिशय हीन दर्जाची पातळी गाठली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एका वाघिणीला ठार करण्यात आले. परंतु चित्र असे रंगविले जात आहे की वाघ हा चिरंजीव आहे. नेत्यांनी किती खोटे बोलावे याचे उदाहरण म्हणजे निरुपम होय. जंगलात एके ४७ रायफल घेऊन शिकारी आणि वन कर्मचारी शेकडोंच्या संख्येने वाघिणीला ठार मारण्यासाठी जात होते असे म्हणणे हा सहस्रकातील सर्वात मोठा खोटारडेपणा आहे. हतबलतेमुळे वाघिणीला ठार करावे लागले. सत्याची मोडतोड करण्याचा निरुपम यांचा हा प्रकार अतिशय निंदनीय आहे, त्यामागे घाणेरडे राजकारण आहे, असेही ते म्हणाले.

चौकशी समितीत कोणकोण?

टी १ म्हणजेच अवनी वाघीण मृत्यू प्रकरणी सखोल चौकशीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. एच. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. वाइल्ड लाइफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे सदस्य डॉ. बिलाल हबीब, वन्यजीव संवर्धन ट्रस्टचे अध्यक्ष अनीष अंधेरीया हे समितीचे सदस्य असून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर समितीचे समन्वयक म्हणून काम पाहतील.

सुपारी देणारेच चौकशी समितीवर – उद्धव

अवनीच्या शिकारीची सुपारी देणारेच तिच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीवर आहेत. ही समिती म्हणजे देखावा आहे. त्यामुळे या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

.. तर उद्धव यांची चौकशी समिती – मुनगंटीवार

वाघिणीच्या मृत्यूप्रकरणी काही चुकीचे किंवा शंकास्पद असेल तर आम्ही उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमू शकतो. समितीचे प्रमुखपद त्यांनी न स्वीकारल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या पाच निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी समिती नेमण्याची विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली आहे, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.