२००२ सालातील मूळ परिपत्रक कायम; राजकीय नेत्यांची छायाचित्रेही बेकायदा 

शासकीय कार्यालये, शाळांमध्ये धार्मिक उत्सव साजरे करण्यास मनाई करणारे आणि देवदेवतांच्या प्रतिमा सन्मानाने काढून घेण्याबाबतचे ग्राम विकास विभागाने पाठिवलेले पत्र मागे घेण्यात आले असले तरी, याच विभागाचे २००२ मधील मूळ परिपत्रक कायम आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये केवळ देवदेवतांचीच नव्हे तर, शासनाने मान्य केलेल्या राष्ट्रीय-राज्यस्तरीय नेत्यांच्या छायाचित्राव्यंतिरिक्त अन्य राजकीय नेत्यांची छायाचित्रे लावणेही बेकायदा ठरणार आहे. ग्रामविकास विभागाच्या कक्ष अधिकाऱ्याने ४ जानेवारी रोजी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना  पत्र लिहून देवदेवतांच्या प्रतिमांना कार्यालयांतून सन्मानाने बाहेर काढण्याचे सांगितल्याने नवा प्रश्न निर्माण झाला होता.

त्यासंदर्भात ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर खळबळ उडाली. शासकीय कार्यालयांमध्ये हिंदू देवदेवतांच्या प्रतिमांवर बंदी घालणारे परिपत्रक मागे घ्यावे, अशी मागणी शिवसेनेने केली. त्यानंतर शुक्रवारी सेनेच्या मागणीवरून हे परिपत्रक मागे घेण्याचे व संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.

आपल्या अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन कक्ष अधिकाऱ्याने जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठिवलेले पत्र रद्द करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांनी दिली. मात्र २००२ मधील मूळ परिपत्रक रद्द करण्यात आलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. २५ जानेवारीला ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविलेल्या खुलासेवजा पत्रातही ४ जानेवारीचे पत्र रद्द करण्यात येत आहे, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र या संदर्भातील विषयांबाबत शासनाच्या धोरणामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेली परिपत्रके, शासन निर्णयांच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी, असे त्यात म्हटले आहे. त्यामुळे मूळ परिपत्रकाचा अंमल कायम राहणार आहे.

शासनमान्य यादी

महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, दादाभाई नौरोजी, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक,  डॉ. एस. राधाकृष्णन,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लाल बहादूर शास्त्री,  महात्मा जोतिबा फुले,  डॉ. झाकिर हुसेन,  व्ही.व्ही.गिरी, राजीव गांधी,  नेताजी सुभाषचंद्र बोस,  छत्रपती शिवाजी महाराज, फक्रुद्दीन अली अहमद, इंदिरा गांधी,  यशवंतराव चव्हाण,  वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, अटलबिहारी वाजपेयी,  के.आर. नारायणन, राजर्षी शाहू महाराज, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, मनमोहन सिंग, श्रीमती प्रतिभाताई पाटील, प्रणब मुखर्जी, नरेंद्र मोदी

 

प्रतिमाबंदीवरून भाजप-सेनेत वाद

मुंबई : शासकीय कार्यालये व शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक उत्सवास व देवदेवतांच्या प्रतिमा लावण्यास बंदी करण्याच्या ग्रामविकास विभागाच्या पत्रावरून शिवसेना व भाजप यांच्यात राजकीय वाद सुरू झाला आहे. या निमित्ताने हिंदूंच्या अस्मितेचा मुद्दा पुढे करून, शिवसेनेने भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तर, शिवसेनेच्या मागणीच्या आधीच हे पत्र मागे घेण्यात आल्याचे जाहीर करून भाजपनेही शिवसेनेवर कुरघोडी करण्याची संधी सोडली नाही.  शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या मेळाव्यात शासकीय कार्यालयात देवदेवतांच्या प्रतिमा लावण्यास बंदी करण्याच्या पत्रावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल चढविला.

अधिकाऱ्याच्या मागे संघटनेची शक्ती

राज्य शासनाच्याच ७ जून २००२ च्या परिपत्रकाचा आधार घेऊन शासकीय कार्यालये व शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक उत्सव साजरे करू नयेत व देवदेवतांच्या प्रतिमा सन्मानाने बाहेर काढून घ्याव्यात, असे जिल्हा परिषदांना पत्र पाठविणाऱ्या कक्ष अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांनी त्याला दुजोरा दिला. मात्र चांगल्या उद्देशाने जिल्हा परिषदांना पत्र पाठविणाऱ्या अधिकाऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग.दि. कुलथे यांनी सांगितले.

विनोद तावडे यांचे प्रत्युत्तर

शिवसेनेवर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी कुरघोडी करण्याची संधी सोडली नाही. शिवसेनेने मागणी केलेले मुळात परिपत्रकच नाही तर ते साधे पत्र आहे. ते पत्रही २५ जानेवारीलाच मागे घेण्यात आल्याचे सांगून तावडे यांनी शिवसेनेवरच निशाणा साधला.