शरद पवार यांच्याबरोबरील भेटीत रणनीती ठरली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर, राज्यात नेमके काय होणार, बिगर भाजप सरकार स्थापन होणार की, राष्ट्रपती राजवट लागू होणार, असे अनिश्चितेचे वातावरण तयार झालेआहे. या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी रात्री काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन, निर्माण झालेल्या राजकीय परिस्थतीवर चर्चा केली. आता राज्यपाल पुढे काय भूमिका घेतात, त्यावर आमचे लक्ष राहणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

१३ व्या विधानसभेची मुदत उद्या रात्री बारा वाजता संपत आहे. भाजप व शिवसेनेचा सत्तासंघर्ष शिगेला पोहचला आहे. परिणामी युतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता मावळली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही सायंकाळी राजपालांची भेट घेऊन पदाचा राजीनामा दिला. त्यांना पुढील व्यवस्था होईपर्यंत काळजीवाहू सरकार म्हणून काम करण्यास सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर राजधानीत वेगाने राजकीय घडोमोडी घडू लागल्या आहेत. राज्यात बिगर भाजप सरकार स्थापन करण्याची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेस नेत्यांमध्येही दिवसभर त्याबाबत खलबते सुरु होती. मुख्यमंत्र्यांचा राजीम्यानंतर रात्री  प्रदेशाध्यक्ष थोरात, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार आदी नेत्यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. नव्याने निर्माण झालेल्या राजकीय परिस्थतीवर बैठकीत चर्चा झाल्याचे थोरात यांनी सांगितले.

शिवसेनेच्या समर्थनाबाबत अद्याप निर्णय नाही – थोरात

राज्यात बिगर भाजप सरकार स्थापन करण्याबाबत काँग्रेसची काय भूमिका असे विचारले असता, त्यावर थेट उत्तर न देता या पुढे राज्यपाल काय भूमिका घेतात, यावर लक्ष ठेवण्याचे सध्या ठरले आहे, असे ते म्हणाले.  भाजपला सत्तेपासू दूर ठेवण्यासाठी सरकार स्थापन करण्याकरिता शिवसेनेला समर्थन देणार का, असे विचारले असता, त्याबाबत अजून काहीही ठरलेले नाही, असे थोरात यांनी सांगितले.