मुलाने रस्त्यात टाकून दिलेल्या हंसा राजपूत (वय ८५ वर्षे) या वृद्धेच्या मदतीसाठी राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था सरसावल्या आहेत. सोमवारी ‘लोकसत्ता’ने याबाबतचे वृत्त सर्वप्रथम प्रकाशित केल्यानंतर अनेक स्वयंसेवी संस्था आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी जीटी रुग्णालयात जाऊन हंसा राजपूत यांची भेट घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांना स्वयंसेवी संस्थेत दाखल करण्याची तयारीही दर्शवली आहे. तर शिवसेने आर्थिक मदत देऊ केली आहे. एवढंच नव्हे तर त्यांच्या मुलाला शोधण्याचे काम शिवसेना आणि मनसेने एकत्रितरित्या हाती घेतले आहे. ज्येष्ठ नागरिक संघटनेनेही राजपूत यांची रूग्णालयात भेट घेऊन प्रकृतिची विचारपूस केली.

मरणासन्न आईला मुलाने रस्त्यावर फेकले.. 

१५ दिवसांपूर्वी कुठून तरी गाडीतून आलेला मुलगा आपल्या खंगलेल्या आईला बॉम्बे हॉस्पिटलसमोर टाकून निघून गेला होता. त्याच वेळी तेथून जाणारे एक आयुर्वेदिक डॉक्टर निरंजन पटेल यांना ती वृद्धा रस्त्यात पडलेली दिसली. त्यांनी तिला रेनकोट दिला आणि खाण्यास दिले. त्यामुळे वृद्धेला थोडी तरतरी आली. त्यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून त्यांच्या मदतीने त्या वृद्धेला जीटी रुग्णालयात दाखल केले. त्यांची स्मृती क्षीण झाल्याने त्यांना फार काही सांगता येत नाही.
राजपूत यांना कुठल्या स्वयंसेवी संस्थेने मदत केली तरच त्यांचे शेवटचे थोडेफार दिवस सुखात जातील, असे आवाहन डॉ. पटेल यांनी केले होते. त्यानंतर ‘लोकसत्ता’ने दिलेल्या वृत्ताने मदतीचे हात सरसावले आहे. बातमी वाचून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तसेच सोशल मिडियावरही याबाबत संताप व्यक्त होतोय.