News Flash

महिना लोटला तरी होर्डिग ‘जैसे थे’

राजकीय होर्डिग लावण्यावर बंदी घातलेली असतानाही मुंबईत सध्या अनेक राजकीय पक्षांचे फलक झळकत आहेत.

संग्रहीत छायाचित्र.

मुंबई उच्च न्यायालयाने राजकीय होर्डिग लावण्यावर बंदी घातलेली असतानाही मुंबईत सध्या अनेक राजकीय पक्षांचे फलक झळकत आहेत. यात पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांचे एक पाऊल पुढे असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे फलक न लावण्याचे आदेश धुडकावून शिवसेनेच्या एका आमदाराने वाढदिवसाचे फलक शहरात लावले आहेत. याबाबत फेब्रुवारी महिन्यात एका सामाजिक संस्थेने या आमदाराच्या या फलकांबाबत न्यायालयात तक्रार केली होती. मात्र हे फलक अद्यापही ‘जैसे थे’ असून पालिका अधिकारी व पोलीस त्याविरुद्ध का कारवाई करीत नाहीत, अशी विचारणा करीत पुन्हा एकदा या सामाजिक संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाकडे पुराव्यांसह तक्रार केली आहे.
मुंबईत राजकीय कार्यकर्त्यांचे वाढदिवस, शुभेच्छा आदींची फलकबाजी करणाऱ्यांना ऊत आला असून बहुतेक पक्षांचे राजकीय फलक, होर्डिग शहरात झळकत आहेत. या फलकबाजीला मुंबई उच्च न्यायालयाने लगाम घातला असून, असे फलक लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. तरीही, असे फलक लावणाऱ्यांची भीड चेपलेली नसल्याने ‘क्लीन मुंबई फाऊंडेशन’ या सामाजिक संघटनेने फलकबाज राजकीय नेत्यांवर कारवाई करण्याची तक्रार थेट दुसऱ्यांदा मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे केली आहे. मुंबईत सध्या लावण्यात आलेल्या राजकीय फलकांची छायाचित्रे या संस्थेने तक्रार अर्जासोबत न्यायालयाला सादर केली आहेत. वरळी येथील शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांच्या २२ फेब्रुवारी रोजी झालेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना विभागप्रमुख, नगरसेवक, शाखाप्रमुख आणि शिवसैनिकांनी वरळी, प्रभादेवी, आर्थर रोड, महालक्ष्मी रेल्वे स्थानक आणि आसपासच्या परिसरात १९ फेब्रुवारीपासून मोठमोठे बॅनर्स झळकविले होते. शिवसैनिकांनी अनधिकृतपणे बॅनर्स लावू नयेत, असे स्पष्ट आदेश दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते.
बॅनर्स लावणे आवश्यक असल्यास संबंधित शासकीय, तसेच महापालिका, नगरपालिका यांची रीतसर परवानगी घ्यावी व त्याचे शुल्क भरून स्थानिक पोलीस ठाण्यात परवानगी आणि शुल्क भरलेली पावती सादर करून मगच बॅनर्स लावावेत.
झळकविलेल्या अनधिकृत बॅनर्सबाबत शिवसेना जबाबदार राहणार नसून त्याची जबाबदारी संबंधितांची असेल, असे सक्त आदेश उद्धव ठाकेर यांनी दिले होते. मात्र त्यानंतर आजही हे बॅनर्स येथे झळकत आहेत. या बॅनर्सवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुनील शिंदे यांच्या छायाचित्रांसह अन्य नेते व कार्यकर्त्यांचे फोटो आहेत. या फलकांबाबत या संस्थेने फेब्रुवारी महिन्यातच न्यायालयात तक्रार केली होती. मात्र तरीही महालक्ष्मी स्थानक, दादर रेल्वे स्थानक, डिलाईल रोड, आर्थर रोड, सात रस्ता, लोअर परळ स्थानक येथे लावण्यात आलेले फलक अद्यापही काढण्यात आलेले नाहीत, असे या संस्थेने तक्रारीत म्हटले आहे.
त्यामुळे काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी अनधिकृतपणे राजकीय फलक न लावण्याबाबत केलेल्या आवाहनाला पाने पुसण्यात आल्याचे बोलले जात आहे. फलकबाजी करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी या फाऊंडेशनने आता पुन्हा एकदा न्यायालयाला केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2016 12:31 am

Web Title: political parties illegal hoardings remain as it is in mumbai
टॅग : Illegal Hoardings
Next Stories
1 निवृत्तिवेतनासाठी ‘त्यां’चा लढा सुरूच
2 कच्चे तेल वगळता अन्य मालावरील जकातीत ७.२५ टक्क्यांनी वाढ
3 भुजबळ-तटकरे यांचे सनदी लेखापाल एकच!
Just Now!
X