बेकायदा फलकबाजी होऊ नये असे प्रत्येक राजकीय पक्षाला वाटत असेल तर प्रत्येक विभागातील पक्षाचा पदाधिकारी वा कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवावी, अशी सूचना न्यायालयाने केली आहे. त्यानंतरही बेकायदा फलकबाजी झाल्यास संबंधित पक्षाच्याच पदाधिकारी वा कार्यकर्त्यांला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच त्याबाबतची भूमिका पुढील सुनावणीच्या वेळी स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

बेकायदा फलकबाजी केल्याबाबत अवमान कारवाईचा इशारा न्यायालयाकडून देण्यात आल्यावर ही बेकायदा फलकबाजी आपण केलेली नाही आणि ती कुणी केली हे माहीत नाही, असा दावा सत्ताधारी भाजपसह मनसे नेत्यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात केला. त्यांच्या या दाव्यावर न्यायालयाने संताप व आश्चर्य व्यक्त केल्यावर या नेत्यांनी ज्या कार्यकर्त्यांनी ही बेकायदा फलकबाजी करणाऱ्यांची नावे आणि पत्ते सादर करण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले.
भाजप, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह अन्य राजकीय पक्ष व नेत्यांनी बेकायदा फलकबाजी करणार नाही आणि कार्यकर्त्यांना ती करू नका, असे बजावण्याची हमी दिली होती. मनसेने बेकायदा फलकबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही न्यायालयाला सांगितले. मात्र नवरात्रोत्सवात मोठय़ा प्रमाणावर बेकायदा फलकबाजी केल्याची छायाचित्रेच ‘सुस्वराज्य संस्थे’च्या वतीने अ‍ॅड्. उदय वारुंजीकर तसेच ‘जनहित मंच’च्या वतीने भगवानजी रयानी यांनी न्यायालयात सादर केली.