पुण्यात एका राजकीय पक्षाचा एक कार्यकर्ता चक्क मुंबईतला सराईत आरोपी निघाला आहे. नितीन चौगुले असे त्याचे नाव असून त्याच्या नावावर घरफोडीच्या तब्बल २०० गुन्ह्यांची नोंद आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाने चौगुलेसह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.
नितीन चौगुले याला पुण्यातून तर त्याचे दोन साथीदार नवनाथ भोईटे (२९) आणि विश्वास खेडेकर (३७) यांना मुंबईतून अटक करण्यात आली. चौगुले मूळ पुण्याचा रहिवाशी असून तेथे एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तो वावरतो. चौगुले पुण्यातून मुंबईत फक्त चोरी करण्यासाठी यायचा. त्याचे राहणीमान अत्यंत उंची असायचे. व्यापारी कार्यालयांतच तो घरफोडी करत असे, अशी माहिती मालमत्ता विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी दिली. चौगुलेला अनेक प्रकरणात अटक झाली होती. मात्र लगेच तो जामिनावर सुटायचा आणि पुन्हा चोरी करायचा, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगार यांनी सांगितले.

हिरे व्यापाऱ्याच्या कार्यालयात एक कोटीची चोरी
नितीन चौगुले आणि त्याच्या दोन साथीदारांनी २००६ मध्ये माटुंगा येथे एका हिरे व्यापाऱ्याच्या कार्यालयात चोरी केली होती. तेथे त्यांना १ कोटी रुपये मिळाले. त्या पैशातून चौगुलेने अंधेरीच्या लोखंडवाला संकुलात एक फ्लॅट विकत घेतला आहे. सध्या हा फ्लॅट पोलिसांनी सील केला आहे. रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौगुले याने सहा लॅपटॉप चोरले होते. यातून जे पैसे आले त्या पैशातून त्याने आपल्या कार्यकर्त्यांना शंभर टी शर्ट घेऊन दिले होते, असेही पोलिसांनी सांगितले.