आधी सामनातून शरद पवारांवर विखारी लेखन करण्यात आलं आहे. आता मुलाखती घेऊन मार्गदर्शन घेतलं गेलं. मुलाखत टीका करण्यासाठी होती, राज्यांच्या प्रश्नांबाबत नव्हती. राज्य कसं चाललं आहे, राज्याचे मुख्यमंत्र्यांना कारभार जमतोय का हे असले प्रश्न विचारले गेले. सामनातून शरद पवारांची मुलाखत घेतली जाते आहे हेच राजकारण आहे. कारण आत्तापर्यंत एकाही वृत्तपत्राने शरद पवारांवर एवढी टीका केली नाही जेवढी सामनाने केली आहे असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे. कुठल्याही नेत्याविरोधात टीका झालेली नाही तेवढी टीका शरद पवारांवर सामनातून केली गेली. ज्या भाषेत केली गेली ती भाषा मी उच्चारु शकत नाही कारण पवारांबाबत माझ्या मनात आदर आहे असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

“संजय राऊत यांनी ज्या ऐटीत, ज्या रुबाबात मुलाखत घेतली त्याचा संदर्भ मी घेतो. त्या मुलाखतीच्या पहिल्याच भागात शरद पवार यांची भीमटोला मुलाखत, सत्तेचा दर्प चालत नाही लोक पराभव करतात असं हेडिंग दिलं आहे. सत्तेचा दर्प चालत नाही त्यासाठी नाव घेण्यात आलं नाही. देवेंद्र फडणवीस हे घमेंडी नेते नाहीत असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. सत्तेवर असतानाही त्यांनी कधी सत्तेची मस्ती दाखवली नाही. त्यांच्या पुन्हा येईन वक्तव्यात गर्व नाही. त्यातून कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र ही बाजू पवारांना दिसत नाही. त्यामुळे त्यांनी जे वाक्य वापरलं ते योग्य नाही. १०५ आमदार निवडून आले त्यात शिवसेनेचं योगदान काय? २०१४ मध्ये शिवसेनेचे खासदार आणि आमदार निवडून आले ते कुणामुळे ते भाजपामुळेच. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेली याचं आश्चर्य वाटतं. शिवसेना जातीयवादी पक्ष आहे भाजपा जातीयवादी पक्ष आहे ही टीका करणारे हेच लोक आहेत. जातीयवादी पक्षासोबत एकत्र येणं हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे की स्वताच्या कल्याणाचं आहे ते समाजवून सांगितलं असतं तर बरं झालं असतं असंही राणे यांनी म्हटलं आहे.

यावेळी १९९५ मधल्या सामनातील अंकात प्रदर्शित झालेले मथळे वाचून दाखवले. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला मुख्यमंत्री आहे की नाही कळत नाही. सगळी अनागोंदी माजली आहे, अशात त्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून ही मुलाखत घेतली अशी प्रतिक्रियाही नारायण राणे यांनी दिली आहे.