उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे गणेशोत्सवासाठी मंडप टाकण्यात येणाऱया अडचणी तसेच अन्य प्रश्नांच्या संदर्भात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील काही गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱयांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर, बुधवारी सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गणेशोत्सव समन्वय समितीच्या पदाधिकाऱयांसह देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ या निवासस्थानी भेट घेणार आहेत. गणेशोत्सवाचे निमित्त साधून शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपवर कुरघोडी करण्याचाच हा प्रयत्न असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. श्रेय घेण्यासाठीच सत्तेत असलेल्या दोन पक्षांमध्ये लढाई असेच चित्र आहे.
गणेशोत्सवासाठी रस्त्यावर मंडप उभारण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने निर्बंध घातले आहेत. गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर आला असताना, न्यायालयाच्या निर्णयामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेशोत्सवासाठी गरज भासल्यास कायद्यातही बदल करू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे.
गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला पाहिजे. पण नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल, वाहतूक नियोजन केले जाईल, तसेच आपत्कालीन आराखडा तयार केला जाईल. याबाबत राज्य सरकार मंडळांच्या पाठीशी राहणार असून, मंडळांचे हे मुद्दे शासन न्यायालयात मांडेल, असे फडणवीस यांनी सांगितल्याचे मंगळवारी आशीष शेलार म्हणाले होते.