राज्यातील धार्मिक स्थळे पाडव्याच्या मुहूर्तावर उघडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून राज्यात राजकारण तापले आहे. भाजपने या निर्णयाचे श्रेय घेत राज्यात ठिकठिकाणी जल्लोष केला, तर मोदींच्या आदेशामुळेच मंदिरे बंद होती, असा पलटवार राष्ट्रवादीने भाजपवर केला आहे.

करोना संसर्ग वाढल्यानंतर लागलेल्या टाळेबंदीच्या काळात मंदिरे बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. आठ महिन्यांनंतर राज्यसरकारने ते उघडण्याचे आदेश दिले. मंदिरे उघडावी म्हणून भाजपने यापूर्वी आंदोलने केली होती. त्याचा संदर्भ देत भाजपने या निर्णयाचे श्रेय घेत आज ठिकठिकाणी जल्लोष केला. यावरून मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे.

‘भाजप प्रत्येक गोष्टीत राजकारण करतय,‘ असे पाटील यांनी नगरमध्ये बोलताना स्पष्ट केले. तसेच मंदिरे उघडण्याचे श्रेय भाजपला जाऊच शकत नाही. तर हे श्रेय मुख्यमंत्री व राज्य सरकारचे आहे,‘ असेही ते म्हणाले. ‘लॉकडाऊनच्या काळात मंदिर बंद करण्याबाबत नरेंद्र मोदी यांनी आदेश दिला होता याकडे त्यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, भाजपचे आमदार राम कदम यांनी ‘पालघर साधू हत्याकांड आम्ही विसरलेलो नाही’ असा इशारा दिला. कदम यांनी सपत्निक  दर्शनासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते.